![]()
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाभरात 2 हजारांहून अधिक वृक्षांची लागवड; जनजागृती रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
गडचिरोली |
पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत गडचिरोली पोलीस दलाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाभरात वृक्षारोपण व जनजागृती अभियान राबवून हरित गडचिरोलीच्या संकल्पनेला नवी उभारी दिली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 2 हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून विविध पोलीस ठाणे, पोस्टे व उपपोस्टे स्तरावर जनजागृती रॅली काढून पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला.
गडचिरोली एम.आय.डी.सी. मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या फळझाडे व सावलीच्या झाडांसह एकूण 250 वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘एक अधिकारी – एक वृक्ष’ या संकल्पनेवर आधारित या मोहिमेत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली.
पर्यावरण हे मानवाच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार असून शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सुपीक जमीन आणि जैवविविधतेचे जतन करण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यावश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विशेष म्हणजे, केवळ वृक्षारोपणावर न थांबता लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन आणि संवर्धन करण्यावरही भर देण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील सर्व पोस्टे, उपपोस्टे व पोलीस मदत केंद्रांमध्ये वृक्षारोपणासोबत पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. अधिकाधिक वृक्ष लागवड करून आणि त्यांचे संवर्धन करून हरित गडचिरोलीच्या निर्मितीत प्रत्येकाने योगदान द्यावे.”
सदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक अनुजकुमार मडामे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत शेळके तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
• जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा विशेष उपक्रम
• एम.आय.डी.सी. मैदानावर 250 वृक्षांची लागवड
• जिल्हाभरात 2,000 हून अधिक वृक्षारोपण
• ‘एक अधिकारी – एक वृक्ष’ संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी
• जनजागृती रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
• पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस दलाचा प्रेरणादायी संदेश
महा Express News Network साठी ही बातमी “हरित गडचिरोलीसाठी पोलीस दलाचा पुढाकार”