![]()
18 जूनला मतदान; 18 मेपासून आचारसंहिता लागू — चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 469 मतदार, गडचिरोलीत 244 सदस्य बजावणार मतदानाचा हक्क
गडचिरोली | वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, येत्या 18 जून 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार असून, विधान परिषदेचा प्रतिनिधी कोण होणार याचा फैसला हे सदस्य करणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 18 मेपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून तिचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा दिला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.
या मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक 469 सदस्य मतदार आहेत. यात चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य, तसेच जिल्ह्यातील 10 नगर परिषद व 7 नगर पंचायतींचे 403 सदस्य समाविष्ट आहेत. दुसरीकडे, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषद व 9 नगर पंचायतींमधील 244 सदस्य, तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर परिषदांचे 264 सदस्य मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. विशेष म्हणजे, तिन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या शून्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील उपविभाग मुख्यालयांमध्ये मिळून 17 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर मतमोजणी चंद्रपूर जिल्हा स्तरावर होणार असून, संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीकडे आता तिन्ही जिल्ह्यांचे राजकीय लक्ष लागले असून, उमेदवारी आणि राजकीय समीकरणांना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.