Home Breaking News रुग्णसेवेतून जिंकली मने; डॉ. विशाल येर्रावार यांना भावपूर्ण निरोप

रुग्णसेवेतून जिंकली मने; डॉ. विशाल येर्रावार यांना भावपूर्ण निरोप

0
14

महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात भावनिक वातावरण; सहकाऱ्यांच्या शुभेच्छांनी निरोप समारंभ उत्साहात

गडचिरोली : महागाव, प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल येर्रावार यांच्या बदलीनिमित्त आयोजित करण्यात आलेला निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. आपल्या सेवाकाळात रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाऱ्यांच्या मनात वेगळी छाप निर्माण करणाऱ्या डॉ. येर्रावार यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात भावपूर्ण निरोप दिला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विशाल येर्रावार, डॉ. शांतनू मुक्कावार तसेच डॉ. स्मिता मजुमदार मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. लुबना हकीम यांनी केले असून, प्रभावी सूत्रसंचालन आरोग्य सेवक राशीद शेख यांनी केले.

प्रास्ताविकात बोलताना डॉ. लुबना हकीम यांनी डॉ. विशाल येर्रावार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी आपल्या सेवाकाळात रुग्णसेवेला नेहमीच सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या शांत, संयमी व सहकार्यशील स्वभावामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. शांतनू मुक्कावार यांनी डॉ. येर्रावार हे कर्तव्यदक्ष, सेवाभावी आणि जनसामान्यांच्या आरोग्याबाबत संवेदनशील अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध आरोग्य उपक्रम प्रभावीपणे राबविले गेले असून, त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

तर, डॉ. स्मिता मजुमदार यांनी आपल्या भाषणात डॉ. विशाल येर्रावार यांच्या रुग्णांप्रती असलेल्या आत्मीयतेचे कौतुक करताना, त्यांनी प्रत्येक रुग्णाला आपुलकीने सेवा देऊन आरोग्य विभागाची प्रतिमा उंचावली असल्याचे सांगितले.

निरोपाला उत्तर देताना भावूक झालेल्या डॉ. विशाल येर्रावार यांनी महागावमधील सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. येथे काम करताना अधिकारी, कर्मचारी व सहकाऱ्यांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “महागावमधील प्रेम, सहकार्य आणि जिव्हाळा आयुष्यभर स्मरणात राहील,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव अंतर्गत सर्व सेविका, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, वाहन चालक, गटप्रवर्तक, आशा वर्कर, शिपाई तसेच कनिष्ठ सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या शुभेच्छा आणि टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here