Home Breaking News अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! गडचिरोलीत १८ मेपासून मोफत निवासी महा-टीईटी क्रॅश कोर्स...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! गडचिरोलीत १८ मेपासून मोफत निवासी महा-टीईटी क्रॅश कोर्स सुरू

0
20

आदिवासी विकास विभागाचा पुढाकार; गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, निवासी सुविधा आणि परीक्षाभिमुख मार्गदर्शनाचा लाभ

गडचिरोली, दि. १४ : अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना शिक्षक होण्याच्या स्वप्नाला नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महा-टीईटी (महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा) देणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्स आयोजित करण्यात आला असून, हा प्रशिक्षण उपक्रम १८ मे २०२६ पासून गडचिरोली येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू होणार आहे.

या विशेष प्रशिक्षणाद्वारे अनुसूचित जमातीच्या इच्छुक उमेदवारांना अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण अध्यापन, परीक्षाभिमुख तयारी तसेच निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सक्षम बनविणे आणि शिक्षक पात्रता परीक्षेत यश संपादन करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील ते उमेदवार पात्र असतील, ज्यांनी जून २०२६ मध्ये होणाऱ्या महा-टीईटी परीक्षेसाठी अर्ज किंवा नोंदणी केली आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, जात व सामाजिक तपशील, शैक्षणिक पात्रता, नोकरीविषयक माहिती (असल्यास) आणि महा-टीईटीसंबंधित आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक राहणार आहे.

नोंदणीसाठी आधार कार्डची प्रत आणि जून २०२६ महा-टीईटी अर्ज अथवा नोंदणी पावतीची प्रत जोडणे बंधनकारक असून, इच्छुकांनी संबंधित क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी atc.ngp-mh@mah.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार असून, गडचिरोली जिल्ह्यातील पात्र आदिवासी युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here