![]()
गडचिरोलीच्या औद्योगिक व खनिज विकासाला मोठी चालना; सुरजागड मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई/गडचिरोली, दि. १४ : विदर्भाच्या विकासाला नवे पंख देणारा आणि महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम सीमांना वेगवान संपर्काने जोडणारा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विदर्भातील तब्बल ५४७ किलोमीटरच्या चार प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांमुळे विशेषतः गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि खनिज विकासाला मोठी चालना मिळणार असून, सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, उद्योग मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी “विदर्भातील विकासाला गती देण्यासाठी हे महामार्ग निर्णायक ठरणार असून, प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत,” असे स्पष्ट निर्देश दिले. विशेषतः नवेगाव मोरे–सुरजागड मार्ग हा खनिज वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरेल आणि तो समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
या बैठकीत नागपूर–गोंदिया, भंडारा–गडचिरोली, नागपूर–चंद्रपूर आणि नवेगाव मोरे–कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता या चार द्रुतगती महामार्गांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांची एकूण स्थापत्य किंमत ३२ हजार ४७८ कोटी रुपये, तर बांधकाम खर्च ५१ हजार ९०६ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती देण्यात आली. हे सर्व प्रकल्प सप्टेंबर ते डिसेंबर २०२८ दरम्यान पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
गडचिरोलीसाठी ‘गेमचेंजर’ प्रकल्प
गडचिरोली जिल्ह्यासाठी भंडारा–गडचिरोली द्रुतगती मार्ग आणि नवेगाव मोरे–कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता हे दोन प्रकल्प विशेष महत्त्वाचे मानले जात आहेत. यामुळे खनिज वाहतूक, औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि दुर्गम भागातील संपर्कव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महामार्गांची ठळक वैशिष्ट्ये :
➡️ नागपूर–गोंदिया द्रुतगती मार्ग – १६२.३७७ कि.मी., ३+३ लेन, ९ इंटरचेंज
➡️ भंडारा–गडचिरोली द्रुतगती मार्ग – ९४.२४१ कि.मी., ३+३ लेन, ६ इंटरचेंज
➡️ नागपूर–चंद्रपूर द्रुतगती मार्ग – २०४.७९९ कि.मी., २+२ लेन, ७ इंटरचेंज
➡️ नवेगाव मोरे–कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता – ८५.७६५ कि.मी., २+२ लेन
विदर्भाच्या आर्थिक, औद्योगिक आणि वाहतूक विकासाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या या महामार्ग प्रकल्पांकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.