Home Breaking News आलापल्ली वन विभागात ‘बोगस मजूर’ प्रकरणाचा स्फोट ? चौकशी समितीकडे १४८ व्हाऊचर...

आलापल्ली वन विभागात ‘बोगस मजूर’ प्रकरणाचा स्फोट ? चौकशी समितीकडे १४८ व्हाऊचर बिलांसह पुरावे सादर !

0
103

व्हिडीओग्राफीद्वारे चौकशीची मागणी; RTGS व्यवहार, बँक खाते आणि वन कर्मचाऱ्यांच्या बयानांचीही तपासणी करण्याचा आग्रह

गडचिरोली : आलापल्ली वन परिक्षेत्रातील कथित बोगस मजूर, संशयास्पद व्हाऊचर बिल व आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनी खळबळ उडाली असून, या प्रकरणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष शंकर कालुराम ढोलगे यांनी त्रिस्तरीय चौकशी समितीसमोर महत्त्वाचे पुरावे सादर केल्याचा दावा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे २०२६ रोजी चौकशी समितीसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून ढोलगे यांनी आलापल्ली वन परिक्षेत्रातील कथित बोगस मजूरांच्या नावांची यादी आणि व्हाऊचर बिलांचे पुरावे समितीकडे सुपूर्द केले. सुमारे ६०० व्हाऊचर बिलांपैकी १४८ व्हाऊचर बिल आणि ३६ संशयित मजुरांची नावे पुराव्यासह सादर करण्यात आल्याचे त्यांनी लेखी बयानात नमूद केले आहे.

ढोलगे यांनी चौकशी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी चौकशीची व्हिडीओग्राफी करण्याची मागणी केली आहे. भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा संबंधितांनी बयान बदलल्यास त्याचे ठोस पुरावे उपलब्ध राहावेत, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

यासोबतच, कथित बोगस मजुरांची चौकशी तक्रारदारासमक्ष करण्यात यावी, त्यांच्या बँक खात्यांची पडताळणी, RTGS व्यवहारांची तपासणी, स्वाक्षऱ्या आणि मोजमाप पुस्तिकांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचेही लेखी बयान नोंदविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, चौकशी निष्पक्ष व कोणताही भेदभाव न करता करण्यात यावी, अन्यथा पोलिस विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत पुनर्चौकशीची मागणी केली जाईल, असा इशाराही लेखी निवेदनातून देण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे आलापल्ली वन विभागातील कारभार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, आता सर्वांचे लक्ष त्रिस्तरीय चौकशी समितीच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here