![]()
अहेरी-आलापल्ली मार्गावर पाणी गळतीचा गंभीर प्रकार; हजारो लिटर पाणी वाया, नागरिकांत संताप
गडचिरोली : अहेरी-आलापल्ली मुख्य मार्गावर टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनमधील व्हॉल्व खराब झाल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे कडक उन्हाळ्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली असताना, दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित ठिकाणी बसविण्यात आलेल्या व्हॉल्वमधून सतत पाणी गळती होत असून याकडे पाणी प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात स्वच्छ पाणी रस्त्यावर वाहून जात असून यामुळे केवळ पाण्याची नासाडी होत नाही, तर रस्त्यालगत चिखल व अपघाताचा धोका देखील निर्माण होत आहे.
दरम्यान, अहेरी तालुक्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. काही गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत पाणी वाचवण्याऐवजी तेच पाणी निष्काळजीपणामुळे वाया जात असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. “ज्या भागात पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणच्या लोकांचे हाल पाहून तरी प्रशासनाने जागे व्हावे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पाणी प्राधिकरण विभागाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देत संबंधित व्हॉल्वची दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नियमित तपासणी व देखभाल यंत्रणा मजबूत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर आंदोलनाचा इशारा
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निष्काळजीपणाविरोधात लवकरच नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे बनले आहे.