Home Breaking News भरधाव ट्रॅक्टरचा कहर! नातेवाईकांच्या लिफ्टने निघाले, पण काळानेच गाठलं; पतिपत्नी जागीच ठार,...

भरधाव ट्रॅक्टरचा कहर! नातेवाईकांच्या लिफ्टने निघाले, पण काळानेच गाठलं; पतिपत्नी जागीच ठार, तरुण गंभीर

0
29

तलवाडा परिसरातील भीषण अपघाताने भामरागड तालुका हादरला

गडचिरोली | आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका तरुणाची प्रकृती गंभीर असल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. ७ मे) सायंकाळी घडली. या अपघातामुळे भामरागड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात कुम्मा महारु पुंगाटी (वय ५६) व त्यांची पत्नी मिडको कुम्मा पुंगाटी (वय ४८), रा. महाकापाडी, ता. भामरागड यांचा मृत्यू झाला. तर आशिष चंदू महाका (वय १७), रा. परायनार, ता. भामरागड हा गंभीर जखमी असून त्याच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुम्मा व मिडको पुंगाटी हे दाम्पत्य कामानिमित्त आलापल्ली येथे आले होते. काम आटोपून ते सायंकाळी दुचाकीने आपल्या महाकापाडी गावाकडे निघाले. दरम्यान, तलवाडा येथे बसची प्रतीक्षा करत असलेला त्यांचा नातेवाईक आशिष महाका दिसल्याने त्यांनी त्याला दुचाकीवर लिफ्ट दिली. मात्र, हीच लिफ्ट त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरली.

तलवाडा गावापासून अवघ्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कुम्मा पुंगाटी यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी मिडको गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला तडफडत होती. आशिष महाका देखील गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या टायगर ग्रुपचे सदस्य साई तुलसीगारी यांनी तत्काळ दोन रुग्णवाहिकांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्याचवेळी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने झाडे रस्त्यावर कोसळली. वीजपुरवठा व मोबाईल नेटवर्क खंडित झाल्याने मदतकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मदतकार्य सुरू ठेवण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच मिडको पुंगाटी यांनी रुग्णवाहिकेत अखेरचा श्वास घेतला. तब्बल रात्री साडेनऊच्या सुमारास रस्ता मोकळा करण्यात आल्यानंतर जखमी आशिषला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.

विशेष म्हणजे, आशिष महाका हा नुकताच दहावी उत्तीर्ण होऊन पुण्यात अकरावीचे शिक्षण घेत होता. परीक्षा पूर्ण करून तो ६ मे रोजी आलापल्ली येथे आला होता. तलवाडा येथे काकांकडे थांबलेला असताना नातेवाईक असलेल्या पुंगाटी दाम्पत्याने त्याला सोबत घेतले आणि नियतीने घात केला.

दरम्यान, संबंधित ट्रॅक्टर हा तलवाडा गावातीलच असून ट्रॅक्टर मालकाने वाहन आपलेच असल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे पुंगाटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here