Home Breaking News विकासकामांना वेग; ‘नो प्लास्टिक’चा कडक इशारा — सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

विकासकामांना वेग; ‘नो प्लास्टिक’चा कडक इशारा — सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0
21

विकासकामांना वेग; ‘नो प्लास्टिक’चा कडक इशारा — सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली/ जिल्ह्यातील विकासकामांना गती देत नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते आज विविध ठिकाणी महत्त्वपूर्ण उद्घाटने व लोकार्पण सोहळे उत्साहात पार पडले. आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण तसेच पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला.

मेंढा येथे ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन सहपालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या उपकेंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होणार असून आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

आमिर्झा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. याच ठिकाणी जिल्ह्यातील पहिले जनावरांच्या स्नानगृहाचे लोकार्पणही करण्यात आले. विशेष म्हणजे, सहपालकमंत्री जयस्वाल यांनी स्वतः गाईला स्नान घालून या सुविधेचे महत्त्व अधोरेखित केले.

इंजेवारी येथे नव्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करून बालकांच्या पोषण व शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर देऊळगाव येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उभारलेल्या नर्सरीची पाहणी करण्यात आली. या नर्सरीत सुमारे १००० आंबा व ७०० शेवगा रोपांची लागवड करण्यात आली असून पर्यावरण संवर्धनासह उत्पन्नवाढीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्लास्टिकविरोधात कठोर भूमिका

दौऱ्यादरम्यान काही ठिकाणी स्वागतासाठी देण्यात येणारे पुष्पगुच्छ प्लास्टिक आवरणात असल्याचे निदर्शनास येताच सहपालकमंत्री यांनी ते स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. प्लास्टिकमुळे वाढणारा कचरा, त्याची विल्हेवाट आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्लास्टिकयुक्त पुष्पगुच्छ देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला.

या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आमदार रामदास मसराम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) दीपक बानाईत यांच्यासह विविध अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखत गडचिरोली जिल्हा प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here