Home Breaking News महागाव हत्याकांड’ प्रकरणाला नवे वळण; आरोपी रोजा रामटेकेस उच्च न्यायालयाकडून जामीन

महागाव हत्याकांड’ प्रकरणाला नवे वळण; आरोपी रोजा रामटेकेस उच्च न्यायालयाकडून जामीन

0
34

महागाव हत्याकांड’ प्रकरणाला नवे वळण; आरोपी रोजा रामटेकेस उच्च न्यायालयाकडून जामीन

गडचिरोली/ अहेरी तालुक्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील पाच जणांच्या विषप्रयोगाद्वारे झालेल्या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, आरोपी रोजा प्रमोद रामटेके हिला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

सदर प्रकरणात अन्न व पाण्यातून विष देऊन पती-पत्नी, त्यांची विवाहित मुलगी, तसेच मावशी व मुलाची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात सून संघमित्रा कुंभारे व मामी रोजा रामटेके यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत कलम ३०२, ३०७, ३२८, १२०-ब, २०१ तसेच कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीचा जामीन अर्ज यापूर्वी अहेरी येथील फौजदारी न्यायालयाने दोन वेळा फेटाळला होता. तसेच २०२४ साली उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्जही नाकारण्यात आला होता. मात्र, अलीकडे पुन्हा सादर करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणी करताना दिनांक ३० एप्रिल रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, जलद न्यायप्रक्रिया हा कैद्यांचा मूलभूत हक्क असून, आरोपी रोजा रामटेके अडीच वर्षांहून अधिक काळ कारावासात आहे. प्रकरणात एकूण ४८ साक्षीदार असून खटल्याची सुनावणी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने आरोपीला अनिश्चित काळ तुरुंगात ठेवणे योग्य ठरत नाही. या पार्श्वभूमीवर माननीय न्यायमूर्ती महेंद्र नेरलीकर यांनी कडक अटींसह जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. कुलदीप महल्ले, अॅड. बोधी रामटेके व अॅड. वैष्णव इंगोले यांनी बाजू मांडली, तर शासनाच्या वतीने सरकारी वकील अॅड. चौके यांनी युक्तिवाद केला.

दरम्यान, “वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे आरोपी व त्यांच्या कुटुंबियांचे जीवन प्रभावित होते. न्यायालयांनी मांडलेली जलद न्यायप्रक्रियेची भूमिका प्रत्यक्षात यावी, ही काळाची गरज आहे. रोझाला मिळालेला जामीन हा वैयक्तिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय आहे,” असे मत अॅड. बोधी रामटेके यांनी व्यक्त केले.

या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली असून पुढील न्यायप्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here