![]()
गडचिरोलीत मातृत्व सेवेत नवी दिशा; आधुनिक तंत्रज्ञानासह एलकेएएमची मोठी झेप
गडचिरोली, : दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण प्रगती साधत हेड्रि येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल रुग्णालय ने दुहेरी यश संपादन केले आहे. रुग्णालयात एपिड्युरल अॅनेस्थेशियाच्या सहाय्याने वेदनारहित सामान्य प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली असून ४०० व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचाही ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे.
अलीकडेच पार पडलेली वेदनारहित प्रसूती ही ग्रामीण भागातील मातांसाठी सुरक्षित, आरामदायक आणि सन्मानजनक प्रसूतीची नवी दिशा ठरत आहे. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही गुंतागुंत निर्माण झाली नाही. विशेष म्हणजे एपिसिओटॉमी, पेरिनियल टिअर किंवा प्रसूतीनंतर रक्तस्राव (PPH) यांसारख्या समस्या उद्भवल्या नाहीत. आधुनिक वैद्यकीय पद्धतींचा वापर करत ‘डिलेयड कॉर्ड क्लॅम्पिंग’ आणि वाय-फाय सक्षम CTG मॉनिटरिंगद्वारे आई व बाळ दोघांचीही सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली.
दरम्यान, रुग्णालयाने ४०० व्या सुरक्षित प्रसूतीचा टप्पाही गाठला आहे. गार्डेवाडा येथील १९ वर्षीय सविता टोप्पो यांना उच्च-जोखीम गर्भावस्थेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा येथून येथे रेफर करण्यात आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने हस्तक्षेप करत १५ एप्रिल २०२६ रोजी सुरक्षित प्रसूती घडवून आणली. सध्या माता व बाळ दोघेही निरोगी असून त्यांच्यावर योग्य देखरेख ठेवण्यात येत आहे.
ही दुहेरी कामगिरी रुग्णालयाच्या वाढत्या क्षमतेचे आणि दुर्गम भागातील नागरिकांना मोफत, दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा देण्याच्या बांधिलकीचे प्रतीक मानली जात आहे. स्थापनेपासूनच हे रुग्णालय हजारो कुटुंबांसाठी आधारवड ठरले आहे.
या यशामागे Lloyds Metals and Energy Limited चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली आहे. “सर्वांसाठी सुलभ व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा” हा त्यांचा उद्देश या उपक्रमातून साकार होत आहे. तसेच Lloyds Infinite Foundation च्या संचालिका कीर्ती रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णकेंद्रित सेवांवर विशेष भर देण्यात येत आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने एलकेएएम रुग्णालय ग्रामीण भारतातील मातृत्व सेवांना नवी ओळख देत असून, वेदनारहित प्रसूती आणि ४०० सुरक्षित जन्मांची कामगिरी ही त्या दिशेने उचललेले भक्कम पाऊल मानले जात आहे.