आलापल्लीत वनकर्मचाऱ्यांचा संघर्ष तीव्र; ५ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा
📍 गडचिरोली | दि. १८ एप्रिल २०२६ आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनकर्मचाऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला स्थगिती मिळाल्यानंतर आता या संघर्षाने नवे वळण घेतले असून, संतप्त वनकर्मचाऱ्यांनी प्रशासनाला थेट ५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मंगळवारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास ‘काम बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिनांक १६ एप्रिल २०२६ पासून आलापल्ली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री जी. जी. गणवीर यांच्या कथित भ्रष्ट, मनमानी व दडपशाही कारभाराविरोधात सर्व क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनासाठी अहेरी येथील माननीय तहसीलदार यांची विधिवत परवानगी घेण्यात आली होती. मात्र, प्रशासनिक दबावामुळे अवघ्या तीन तासांतच ही परवानगी रद्द करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव आंदोलन स्थगित करावे लागले.
या घडामोडींनंतर १७ एप्रिल रोजी वनरक्षक व पदोन्नती वनपाल संघटनेचे पदाधिकारी आलापल्ली येथे दाखल झाले. त्यांनी संबंधित वनकर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्यांचे मनोबल वाढवले तसेच आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक, आलापल्ली वनविभाग यांच्या दालनात भेट घेऊन कर्मचाऱ्यांची बाजू ठामपणे मांडली. यावेळी गडचिरोली वनवृत्त अध्यक्ष श्री सिद्धार्थ मेश्राम, कार्याध्यक्ष श्री भारत साबळे, सुनील पेंदोरकर, संजय रामगुंडावार, केंद्रीय संघटक पुनमचंद बुद्धावर, तसेच विविध विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनकर्मचाऱ्यांच्या वाढत्या आक्रोशामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास ‘काम बंद’ आंदोलनामुळे वनविभागाचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.