Home Breaking News आलापल्ली : वन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनात नाट्यमय वळण

आलापल्ली : वन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनात नाट्यमय वळण

0
22

सकाळी परवानगी – दुपारी रद्द; प्रशासनावर दबाव तंत्राचा आरोप

गडचिरोली : आलापल्ली येथे सुरू असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाला गुरुवारी (दि. 16 एप्रिल 2026) नाट्यमय वळण मिळाले. सकाळी आंदोलनास परवानगी देण्यात आल्यानंतर काही तासांतच ती रद्द करण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आलापल्ली येथील वनपाल श्री. शंकर चंद्रया रंगूवार यांनी बेमुदत धरणे आंदोलनासाठी तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, अहेरी यांच्याकडे अर्ज सादर केला होता. पोलीस स्टेशन अहेरी यांच्याकडून आवश्यक नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रशासनाने सकाळी आंदोलनास सशर्त परवानगी दिली होती.

मात्र, दुपारनंतर अचानक परिस्थिती बदलली. उपवनसंरक्षक, आलापल्ली वनविभाग यांच्या पत्राचा दाखला देत तहसिलदार कार्यालयाने दिलेली परवानगी रद्द केल्याचा आदेश काढण्यात आला. सध्या वनवणवा हंगाम सुरू असून आलापल्ली वनपरिक्षेत्र संवेदनशील असल्याने आंदोलनामुळे जंगलाला धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच आंदोलनकर्त्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी थेट पत्रव्यवहार केल्याचेही नमूद करत प्रशासनाने परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सकाळी परवानगी देऊन दुपारीच ती रद्द केल्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. “हा निर्णय अचानक का बदलला?” असा सवाल उपस्थित करत काही कर्मचाऱ्यांनी यामागे दबाव तंत्राचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, आंदोलन शांततेत आणि कायदेशीर चौकटीत होणार होते. तरीही परवानगी रद्द केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून मात्र वनसंवर्धन आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊनच निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणामुळे आलापल्लीतील वनविभागातील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here