Home Breaking News आलापल्ली वनविभागात खळबळ : वनकर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, अधिकाऱ्यावर गंभीर आरोपांची मालिका

आलापल्ली वनविभागात खळबळ : वनकर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, अधिकाऱ्यावर गंभीर आरोपांची मालिका

0
14

 

📍गडचिरोली : आलापल्ली वनविभागात मोठी खळबळ उडाली असून, वनपरिक्षेत्र कार्यालयातीलच क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. भ्रष्टाचार, दडपशाही आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करत कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनपरिक्षेत्र अधिकारी जी. जी. गणवीर यांच्या कार्यपद्धतीविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांच्या इशाऱ्याखाली विभागात मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना गुलामांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी आंदोलन छेडले आहे.

कर्मचाऱ्यांनी पुढे आरोप केला आहे की, मंजूर विकासकामे केवळ २५ ते ३० टक्के खर्चात पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला जातो. अन्यथा कामे न करण्याचे निर्देश दिले जात असल्याने विकासकामांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तसेच, जिल्हा वार्षिक नियोजनांतर्गत सन २०२४ पासून आतापर्यंत झालेल्या कामांमध्ये ठेकेदारांशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, मजुरांची मजुरी दोन ते तीन महिने थकवून ठेवली जात असल्याची तक्रार समोर आली आहे. विशेष म्हणजे, मजुरीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतरही ती मजुरांना न देता RTGS व्यवहारांमध्ये अफरातफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

महिला कर्मचाऱ्यांशी अशिष्ट वर्तन, अपमानास्पद भाषा वापरणे आणि मानसिक दबाव टाकण्याचे प्रकारही घडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे कार्यरत महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही सांगण्यात आले.

आंदोलनकर्त्यांच्या मते, या सर्व प्रकरणांबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. चौकशीचे अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी अखेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नसून, प्रशासन या प्रकरणात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here