भामरागड दौऱ्यात आरोग्य, शेती, पाणी, शिक्षण व ग्रामविकास योजनांचा सखोल आढावा
गडचिरोली, दि. ५ : भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातही स्थानिक साधनसंपत्तीचा प्रभावी वापर करून स्वावलंबी विकास साधता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून पल्ली गाव पुढे येत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले. त्यांनी पल्ली व टेकला ग्रामपंचायतींना भेट देत विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
पल्ली गावात आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड, घरोघरी परसबागा, भाजीपाला उत्पादन तसेच कुक्कुटपालन यांसारखे पूरक व्यवसाय विकसित झालेले दिसून आले. येथे उत्पादित होणारा विषमुक्त भाजीपाला भामरागड बाजारात मोठ्या प्रमाणात विकला जात असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादनाचे मूल्यवर्धन करून बचत गटांच्या माध्यमातून बाजारपेठ निर्माण करण्याच्या सूचना गाडे यांनी दिल्या.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत सरपंच, ग्रामस्थ व महिला बचत गट सदस्यांशी संवाद साधताना त्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. बचत गटांना उपलब्ध निधीतून कुक्कुटपालन, शेळीपालन व भाजीपाला लागवड यांसारख्या व्यवसायांना चालना देण्यावर भर देण्यात आला. समुदाय गुंतवणूक निधी (CIF) चा प्रभावी वापर करून उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य क्षेत्राचा आढावा घेताना प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील औषधसाठा, महिलांची आरोग्य तपासणी, रक्ताल्पता स्थिती, आरोग्य शिबिरे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ याबाबत माहिती घेण्यात आली. अंगणवाडीतील मुलांचे पोषण, अमृत आहार वितरण व स्वच्छतेच्या सुविधांची पाहणी करण्यात आली. आशा कार्यकर्त्यांच्या सेवेत नियमितता राखण्याचे निर्देश देण्यात आले.
ग्रामविकासाच्या दृष्टीने १५ व्या वित्त आयोगाचा निधी, पेसा अंतर्गत कामे, लोकसहभागातून राबविण्यात आलेली विकासकामे व बंधारे बांधकाम याचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत सौरऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न करून इतर गावांसाठी आदर्श निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी करताना पाण्याची गुणवत्ता, क्लोरीन साठा व पाणीपट्टी वसुलीवर विशेष भर देण्यात आला. योजनांची शाश्वतता टिकवण्यासाठी पाणीपट्टी वसुली आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची अक्षर व अंक ओळख तपासण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत अधिक गुण मिळविण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक गावात क्रीडांगण उभारण्याच्या उपक्रमामुळे युवकांना खेळांसोबतच पोलीस भरतीची तयारी करता येईल, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर टेकला ग्रामपंचायतीतही विविध योजनांचा आढावा घेत नागरिकांना ग्रामपंचायत स्तरावरच दाखले उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तहसील कार्यालयाच्या अनावश्यक फेऱ्या टाळण्यासाठी स्थानिक स्तरावर सेवा सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हा दौरा ग्रामविकासाला नवी दिशा देणारा ठरला असून पल्लीसारखी गावे स्वावलंबी विकासाचे प्रेरणादायी मॉडेल म्हणून उदयास येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.