डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित रुग्णांना दिलासा; दुर्गम भागातील महिलांना लाभ
अहेरी | दि. २८ मार्च २०२६ : महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘वी केअर अँड क्युअर’ या उपक्रमांतर्गत गर्भाशय मुख कर्करोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन महिला व बाल रुग्णालय, अहेरी येथे करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक तथा राज्य आयएमए – एचपीव्ही लसीकरण, गर्भाशय मुख व स्तन कर्करोग समिती अध्यक्षा डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरात व्हिज्युअल इन्स्पेक्शन ऑफ अॅसिटिक अॅसिड (VIA) पद्धतीने तपासणी करण्यात आलेल्या संशयित कर्करोगग्रस्त महिलांवर उपचार करण्यात आले.
अहेरी, मूलचेरा, भामरागड आणि एटापल्ली या दुर्गम तालुक्यांतील एकूण ६ महिलांवर स्त्रीरोगतज्ञ डॉ. राहुल महल्ले तसेच ओटी इंचार्ज श्रीमती वनिता मडावी व त्यांच्या टीमद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी उपजिल्हा रुग्णालय अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, महिला व बाल रुग्णालय अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, उपअधीक्षक श्री. नरहरी (SDH अहेरी) व श्री. निहाटे (WH अहेरी) यांचे विशेष सहकार्य लाभले.
तसेच, स्त्रीरोगतज्ञ डॉ. नितीन काटवले, अॅनेस्थेशिया तज्ञ डॉ. लायबर, एनसीडी विभागाच्या डीपीसी श्रीमती प्रेरणा राऊत (गडचिरोली), एनसीडी समुपदेशक श्री. गोपाल कोडापे, अधिपरिचारक श्री. अजय राठोड, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती शुभांगी वाळके यांच्यासह महिला व बाल रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरामुळे दुर्गम भागातील महिलांना वेळेत निदान व उपचाराची संधी मिळून आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे.