युवकांना आत्मनिर्भरतेचा मंत्र, ऊर्जा सुरक्षिततेवर पंतप्रधानांचे मार्गदर्शन
गडचिरोली | दि. २९ मार्च २०२६ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या संवाद मालिकेचा १३२ वा भाग आज गडचिरोली शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पाहण्यात आला. शहरातील शाहूनगर प्रभागातील बुथ क्रमांक १०१ येथे माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी कार्यकर्ते व नागरिकांसह ‘मन की बात’ कार्यक्रम एकत्रितपणे पाहत पंतप्रधानांच्या विचारांना प्रतिसाद दिला.
या भागात पंतप्रधानांनी देशासमोरील विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी दरांवरील परिणाम तसेच देशाची ऊर्जा सुरक्षितता यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच, युवकांनी बदलत्या परिस्थितीत संधी ओळखून आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करावी, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.
कार्यक्रमाला मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, राहुल झोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
उपस्थितांनी ‘मन की बात’मधून मिळणारी सकारात्मक ऊर्जा, देशभक्तीची भावना आणि विकासाभिमुख विचारांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे समाजात जागरूकता वाढून राष्ट्रहिताच्या कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
एकूणच, ‘मन की बात’चा १३२ वा भाग गडचिरोलीत प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक ठरला.