नक्षलवाद्यांची शेवटची प्रतीकेही नष्ट; गडचिरोली पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी.
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलवाद्यांनी आपली दहशत आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उभारलेली ४४ स्मारके आज बुधवारी गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने एकाच मोहिमेत भुईसपाट केली.
जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नक्षल दहशतीचे उच्चाटन करण्यासाठी राबवण्यात आलेल्या या व्यापक मोहिमेमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला असून, जनमानसातील भीती दूर करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नक्षलवादी चळवळ आता गडचिरोली जिल्ह्यात अखेरच्या घटका मोजत असली, तरी दुर्गम भागातील जनतेच्या मनात दहशत कायम ठेवण्यासाठी नक्षलवाद्यांकडून ठिकठिकाणी स्मारके उभारली जात होती. ही स्मारके म्हणजे केवळ सिमेंटची बांधकामे नसून नक्षलवाद्यांच्या हिंसक विचारांची आणि दहशतीची प्रतीके होती. ही प्रतीके नष्ट करण्याचा निर्धार करत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज १८ फेब्रुवारीला पहाटेपासूनच जिल्ह्याच्या विविध उपविभागांत विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेत सी-६० कमांडोज, सीआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाच्या एकूण १८ पथकांतील सुमारे ८०० जवानांनी सहभाग घेतला. नक्षलवाद्यांनी पेरलेल्या सुरुंगांचा आणि स्फोटकांचा धोका लक्षात घेता, १६ बॉम्ब शोधक व नाशक पथकांनाही या मोहिमेत पाचारण करण्यात आले होते. तपासादरम्यान १५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ४४ स्मारके आढळून आली. यामध्ये सर्वाधिक १८ स्मारके एटापल्ली उपविभागातील असून, हेडरी १७, भामरागड ५, जिमलगट्टा २, तर धानोरा आणि पेंढरी उपविभागातील प्रत्येकी एका स्मारकाचा समावेश आहे.
संवेदनशील भागात धाडसी कारवाई
अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी आणि गट्टा (जां.) यांसारख्या गावांमधील ही स्मारके उद्ध्वस्त करून पोलिसांनी या भागात नक्षलवाद्यांची असलेली मानसिक पकड सैल केली आहे. जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली असून, नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील आहे. ही स्मारके नष्ट केल्याने ग्रामस्थांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनावरील त्यांचा विश्वास वृद्धिंगत झाला आहे, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी यावेळी नमूद केले.
