![]()
लाचखोर महसूल सहाय्यक ‘एसीबी’च्या जाळ्यात; दिव्यांग तक्रारदाराच्या धाडसाचा गौरव ३ हजार रुपयांच्या लाचेसाठी दिव्यांग व्यक्तीला छळले ; पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या हस्ते तक्रारदाराचा सत्कार
नागपूर : शारीरिक मर्यादांवर मात करून भ्रष्टाचाराच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या एका दिव्यांग किराणा दुकानदाराच्या धाडसामुळे नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाचखोर महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडले. या कर्तव्यदक्ष तक्रारदाराचे कौतुक करण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी त्यांचा सत्कार करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले तक्रारदार हे व्हिलचेअरच्या सहाय्याने आपला किराणा व्यवसाय सांभाळतात. त्यांच्या आणि नातेवाईकांच्या नावातील सातबारा दुरुस्तीसह, मयत आईचे नाव कमी करण्यासाठी त्यांनी अपर तहसील कार्यालय, बेला (ता. उमरेड) येथे अर्ज केला होता. हे रीतसर काम करण्यासाठी महसूल सहाय्यक विजय सडमाके याने त्यांच्याकडे ४,००० रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ३,००० रुपये देण्याचे ठरले. यातील २,००० रुपये सडमाके याने आधीच घेतले होते आणि उर्वरित १,००० रुपयांसाठी तो तक्रारदाराला त्रास देत होता. वारंवार लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने खचून न जाता ‘एसीबी’ नागपूरकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक मयुर चौरसीया आणि त्यांच्या पथकाने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी बेला येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे १,००० रुपये स्वीकारताना विजय सडमाके याला पथकाने रंगेहात अटक केली. आरोपीविरुद्ध बेला पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका दिव्यांग व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध दाखवलेली ही जिद्द प्रेरणादायी आहे. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी तक्रारदाराला नागपूर कार्यालयात आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. केवळ सत्कारच नाही, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणालीनुसार तक्रारदाराचे प्रलंबित शासकीय काम पूर्ण करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणी लोकसेवक लाचेची मागणी करत असेल, तर घाबरून न जाता निर्भयपणे पुढे यावे. लाच देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.