Home Breaking News घरी वडिलांचे पार्थिव… तरीही लेकीने धैर्याने दिला बारावीचा पेपर! अश्रूना आवर, स्वप्नांना...

घरी वडिलांचे पार्थिव… तरीही लेकीने धैर्याने दिला बारावीचा पेपर! अश्रूना आवर, स्वप्नांना आधार; जान्हवीची लढाई

0
31

घरी वडिलांचे पार्थिव… तरीही लेकीने धैर्याने दिला बारावीचा पेपर!
अश्रूना आवर, स्वप्नांना आधार; जान्हवीची लढाई

तुमसर (भंडारा) : एकीकडे घरात वडिलांचे पार्थिव शांत पडलेले… अंगणात शोककळा… नातेवाइकांच्या हुंदक्यांनी आसमंत भरून गेलेला… आणि दुसरीकडे आयुष्याची निर्णायक वळण घेणारी बारावीची परीक्षा! अशा काळजाचा ठाव घेणाऱ्या प्रसंगातही एका लेकीने अश्रूना आवर घालत हातात पेन घेतले आणि इंग्रजीचा पेपर लिहायला बसली. जान्हवी हौशीलाल राहांगडाले असे या लेकीचे नाव असून तिची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. दुःखाच्या गर्तेतही शिक्षणाची मशाल हातात घट्ट पकडणाऱ्या जान्हवीच्या जिद्दीने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू, तर अनेकांसमोर प्रेरणा निर्माण केली आहे.

तुमसर तालुक्यातील आंबागड येथील रहिवासी तिचे वडील हौशीलाल राहांगडाले (५१) सोमवारी दुपारच्या सुमारास सायकलने घरी परतत असताना अचानक तोल जाऊन खाली कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्षणात संसाराचे आभाळ कोसळले. घरातील आधारवड हरपला; परंतु नियतीचा क्रूर खेळ इथेच थांबला नाही. दुसऱ्याच दिवशी आज मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर. विषय होता इंग्रजी. जान्हवी ही जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथील विद्यार्थिनी. आयुष्याच्या टर्निंग पॉइंटवर उभी असलेली ही मुलगी एका क्षणात पितृछत्र हरपून बसली होती. परीक्षा केंद्रात सकाळी दहाच्या सुमारास मामाच्या मुलासोबत परीक्षा केंद्रात दाखल झाली. डोळ्यांत अश्रूचे ढग, मनात वडिलांची सतत आठवण; पण चेहऱ्यावर धैर्याची सावली. कुटुंबीयांनी शाळेचे मुख्याध्यापक पंकज बोरकर व केंद्र संचालक प्रा. नीलकंठ कापगते यांना घटनेची माहिती दिली. दोघांनीही जान्हवीला मानसिक आधार देत तिच्या पाठीशी उभे राहिले.

जान्हवी ही अभ्यासात अत्यंत हुशार असल्याचे तिला शिकविणारे प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश चाचिरे यांनी सांगितले. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बेताची आहे. परिस्थितीवर मात करून तिने शिक्षण घेण्याचे ठरविले. आंबागड ते तुमसर हे अंतर आठ किलोमीटर आहे. दररोज मात्र ती नियमित येत होती.
जान्हवी आपल्या वडिलांच्या अगदी लाडकी होती. वडिलांचे छत्र हरपल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही तिने स्वतःला सावरले. आयुष्याच्या कठीण वळणावर खंबीरपणे उभी राहिली. दुपारी पेपर देऊन ती गावात परतली आणि वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी संपूर्ण आंबागड गाव हळहळले. प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होते दुःखाचेही आणि अभिमानाचेही. परीक्षागृहात बसताना तिच्या डोळ्यांसमोर वडिलांचा चेहरा तरळत होता.

‘बारावीची परीक्षा ही जीवनातील महत्त्वाची वळण आहे. बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला हा पेपर द्यायचाच होता,’ असे सांगताना तिचा आवाज दाटून आला. पेपर पूर्ण होताच तिने अश्रूना मोकळी वाट करून दिली. आतापर्यंत जपलेला धीर क्षणात ढासळला; पण ती परीक्षा देऊन बाहेर पडली होती हेच तिच्या जिद्दीचे प्रतीक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here