Home Breaking News बिनागुंडा इथे ध्वज फडकला

बिनागुंडा इथे ध्वज फडकला

0
37

माओवाद्यांच्या राजधानीत
माओवाद्यांचे स्मारक नष्ट करून माओवाद्यांचे दहशत उद्ध्वस्त करत ; बिनागुंडा येथे तिरंगा फडकावत इतिहास रचणारा गणतंत्र दिवस….

गडचिरोली : जिल्ह्यातील ज्या  गेली ४० वर्षांपासून अबुजमाडच्या घनदाट जंगलात आणि डोंगराळ भागात माओवाद्यांचा ‘जनताना सरकार’ चालत होता, जिथे त्यांचीच पूर्व दिशा होती, फक्त बंदुकांच्या गोळ्यांचा आणि चकमकींचा आवाज घुमत होता, त्या माओवाद्यांच्या राजधानीत आज गडचिरोली पोलिसांनी इतिहास रचला. गणतंत्र दिनानिमित्त पहिल्यांदाच तिरंगा फडकवून विजयाचा जयघोष केला. हा केवळ एक उत्सव नव्हता, तर दशकानुदशके चाललेल्या नक्षल दहशतीवर शिक्कामोर्तब ठरलेला विजयाचा क्षण होता.

गडचिरोली हे नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो नक्षलवाद्यांचा जिल्हा. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील हा अबुजमाडचा परिसर घनदाट जंगले, अवघड डोंगर माओवाद्यांचा अडिग गड. येथे दशकानुदशके फक्त त्यांचाच राज चालायचा. पोलिसांना इथे पाऊलही रोवता येत नव्हते. नक्षल शोध मोहिमांमध्ये अनेक चकमकी झाल्या, शहीद जवानांचे रक्त सांडले, ठार झालेले माओवादीही असतील, पण या बालेकिल्ल्यात पोलिस यंत्रणा पाय रोवू शकली नाही. गावकऱ्यांवर दहशत, विकासापासून वंचित, फक्त भीतीचे वातावरण होते.

केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा पूर्ण नायनाट करण्याचा ठाम निर्धार जाहीर केला. महाराष्ट्र आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त मोठ्या अभियानाने माओवाद्यांना दोन्ही बाजूंनी घेरले. ‘सडो की पडो’ ही धोरणात्मक रचना यशस्वी झाली. काही वरिष्ठ माओवादी नेते आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात आले, तर अनेकांना पोलिसांनी कंठस्नान घातले. सीमावर्ती भागात आता अनेक पोलिस मदत केंद्रे उभी राहिली. गावकऱ्यांना सुरक्षा मिळाली आणि आज हा चमत्कार घडला. माओवाद्यांच्या गडात पहिल्यांदाच गणतंत्र दिवसाचा भव्य उत्सव साजरा झाला आणि तिरंगा फडकला.

छत्तीसगडच्या नारायणपूर मधील नेलांगुर आणि महाराष्ट्राच्या गडचिरोलीतील कवंडे, तूमरकोटी, फुलणार, बिनागुंडा या ठिकाणी प्रथमच राष्ट्रध्वज फडकवला गेला. तिरंग्याखालील जयघोष, राष्ट्रगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले. स्थानिक आदिवासींसह पोलिस जवानांनी एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी आनंद आणि आशेचा भाव दिसला.

बिनागुंडा येथे माओवाद्यांचे स्मारक नष्टः दहशत उद्ध्वस्त

नुकतेच २४ जानेवारीला बिनागुंडा येथे नवीन पोलिस मदत केंद्र उभारले गेले. पण गावालगतच माओवाद्यांचे एक स्मारक त्यांच्या अस्तित्वाचे आणि दहशतीचे प्रतीक उभे होते. पोलिसांनी ते स्मारक पूर्णपणे नष्ट करून माओवाद्यांची मानसिक दहशत मोडून काढली. गणतंत्र दिवशी तिरंगा फडकवत बिनागुंड्यात जल्लोष झाला. आता या भागात रस्ते, वीज, कनेक्टिव्हिटी यांसारखे विकासाचे दिवस उजेडात येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here