गोंडवाना विद्यापीठात ‘बालविवाह मुक्त भारत’ १०० दिवस अभियानांतर्गत शपथ ग्रहण
गडचिरोली : दि.9/1/26 भारत सरकारच्या महिला व बालविकास आयुक्तालयाच्या निर्देशानुसार देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘बालविवाह मुक्त भारत’ १०० दिवस अभियानाअंतर्गत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे बालविवाहाच्या विरोधात शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांची तसेच संविधानिक अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . उपस्थित सर्वांनी बालविवाह न करण्याची, बालविवाहास आळा घालण्यासाठी समाजात जनजागृती करण्याची तसेच बालहक्कांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.
यावेळी मार्गदर्शन करताना बालविवाहामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर व सर्वांगीण विकासावर होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. बालविवाह प्रतिबंधक कायदा व त्यातील तरतुदींची माहिती देत प्रत्येक सजग नागरिकाने बालविवाह रोखण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले .
हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, ‘बालविवाह मुक्त भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरातून समाजापर्यंत बालविवाह निर्मूलनाचा संदेश पोहोचविण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार जनसंपर्क अधिकारी वर्षा कोल्हे यांनी केले .