Home Breaking News आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळेच बाळासह गरोदर मातेचा दुर्दैवी मृत्यू : सहा किमी पायपीट...

आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळेच बाळासह गरोदर मातेचा दुर्दैवी मृत्यू : सहा किमी पायपीट जीवावर बेतली.

0
33

 

गडचिरोलीत आईसह बाळाचा दुर्दैवी मृत्यू : सहा किमी पायपीट जीवावर बेतली.

गडचिरोली : एकीकडे मुख्यमंत्र्यांकडून जिल्ह्याला ‘स्टील हब’ आणि क्रमांक एक बनवण्याच्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या खाण क्षेत्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या अभावी गरोदर मातांना मृत्यूशी झुंजावे लागत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगा (२४) या नऊ महिन्यांच्या गरोदर मातेला प्रसूतीसाठी तब्बल सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली. या शारीरिक त्रासामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीत आधी
पोटतील बाळ दगावले आणि काही वेळातच मातेनेही अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेने जिल्ह्यातील अपुऱ्या पायाभूत सुविधांचे विदारक
वास्तव पुन्हा एकदा समोर आले.

आलदंडी टोला हे गाव मुख्य रस्त्यापासून तुटलेले असल्याने तेथे प्रसूतीची कोणतीही सोय नाही. वेळेवर मदत मिळावी या आशेने आशा किरंगा १ जानेवारीला आपल्या पतीसह जंगलाच्या वाटेने ६ किलोमीटरची पायपीट करत पेठा येथील आपल्या बहिणीच्या घरी निघाल्या. अवजडलेल्या अवस्थेत केलेल्या पायपीटमुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. २ जानेवारीला पहाटे त्यांना तीव्र प्रसववेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून हेडरी येथील कालीअम्माल रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला खरा, पण तोपर्यंत उशीर झाला. पोटातच बाळाचा मृत्यू झाला आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे काही वेळातच आशा यांचीही प्राणज्योत मालवली.

मृत्यूनंतरही फरफट थांबेना

प्रशासकीय असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे, मृत्यूनंतरही या आई आणि बाळाच्या पार्थिवाची हेळसांड थांबली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत त्यांना पुन्हा ४० किलोमीटर लांब अहेरीला पाठवण्यात आले. जिवंतपणी नशिबी आलेली पायपीट मृत्यूपश्चातही उदासीन सरकारी व्यवस्थेच्या फेऱ्यात अडकल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

संबंधित गरोदर मातेची आशासेविकेमार्फत नोंदणी करण्यात आली होती. पायपीट केल्यामुळे कदाचित त्यांना अचानक प्रसववेदना होऊन गुंतागुंत निर्माण झाली असावी. डॉक्टरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. या संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला असून प्रकरणाची चौकशी केली जाईल.

– डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here