Home Breaking News *चितळाने अचानक रस्त्यावर झेप घेतल्याने भीषण अपघात* चितळाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार...

*चितळाने अचानक रस्त्यावर झेप घेतल्याने भीषण अपघात* चितळाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी !..

0
62

चितळाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी.                                                                                            आरमोरी : आरमोरी तालुक्यातील जांभळी येथील दोन नागरिक दुचाकीने आरमोरीकडे येत असताना चितळाने अचानक रस्त्यावर झेप घेतल्याने भीषण अपघात झाला. चितळाच्या धडकेत दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर कोसळले, यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. २१) सकाळी ९ वाजताच्या सुमारास मानापूर-देलनवाडी-नागरवाही रस्त्यावर घडला.                                      
जांभळी येथील धनिराम पदा आणि रेवनदास उसेंडी हे दोघे आपल्या मोटरसायकलने दिवाळीचे सामान घेण्यासाठी आरमोरीकडे जात होते. नागरवाही जंगलाच्या मार्गावरून जात असताना चितळाने अचानक रस्ता ओलांडण्यासाठी झेप घेतली. वेगात असलेल्या दुचाकीची चितळाला धडक बसल्याने दोघेही रस्त्यावर कोसळले. या अपघातात दुचाकी चालवत असलेले धनिराम पदा यांना गंभीर दुखापत झाली, तर मागे बसलेले रेवनदास उसेंडी यांना किरकोळ दुखापत झाली. चितळाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.: प्राथमिक आरोग्य केंद्र, देलनवाडी येथे प्राथमिक उपचारानंतर पदा यांना गंभीर दुखापतीमुळे आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.                                  
घटनेची माहिती मिळताच जांभळीच्या सरपंच अनती उसेंडी यांनी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांना कळवले. घोडाम यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. धनिराम पदा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलवणे गरजेचे होते.                           
घोडाम यांनी आमदार रामदास मसराम यांना फोनद्वारे माहिती दिली. आ. मसराम यांनी त्वरित दखल घेऊन जखमींना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तसेच, त्यांनी देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक वरुण यांना अपघाताची चौकशी करून जखमींना तातडीने शासकीय मदत देण्याची सूचना केली. जखमी धनिराम पदा यांच्यावर सध्या गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.                            

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here