कोरची
पत्नीची हत्या करून तब्बल १५ दिवसापासून फरार असलेला आरोपी उत्तर प्रदेशाच्या मथुरा येथील वृदांवन मध्ये साधू बनून लपून बसलेला होता. त्या आरोपी पतीचे नाव प्रितराम भक्तू धकाते (४८ वय) रा. कोचीनारा असे आहे. या आरोपीला कोरची पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर व त्यांच्या पथकाने साधूचे वेश परिधान करून पाच दिवसात मथुरावरून सोमवारी अटक करून कोरची पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आज कुरखेडा न्यायालयामध्ये आरोपीला हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पत्नीची हत्या करून पोलीस अटक करणार या भीतीने आरोपी प्रीतराम धकाते यांनी घटनास्थळारावरून मोटरसायकलने जंगलाच्या दिशेने पड काढत मोटरसायकल जंगलात ठेवून तिथून हायवे रस्त्यावर येऊन एका ट्रान्सपोर्ट ट्रकला हात देऊन त्या ट्रकवर बसून उत्तर प्रदेशातील मथुराला निघून गेला. या घटनेनंतर गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते कारण आरोपीने घटने पूर्वी व घटनेच्या दिवशी काही लोकांना धमकावले होते परंतु पंधरा दिवसापासून फरार प्रीतराम हा उत्तर प्रदेशातील मथुरा वृंदावन येथे असल्याचे सी टाईप मोबाईल रेंज वरून समजले तेव्हा कोरची सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकवर व त्यांचे तीन पोलीस अंमलदार खाजगी वाहनाने निघाले. तिथे गेल्यावर मथुरा येथील वृंदावन ललित नगर धाम परिसरामध्ये साधूच्या वेशात आरोपी लपून बसला असल्याची माहिती तेथील लोकांनी सांगितले तेव्हा कोरची पोलीस स्टेशनच्या API गणेश फुलकवर तिथे पाच दिवस साधूच्या वेशात थांबून शेवटी आरोपी प्रीतराम धकाते ला पकडले.


