कोरची
पत्नीची निर्घृणपणे हत्या व प्रतिकार करणाऱ्या स्वतःच्या मुलीला गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पंधरा दिवसापासून फरार झालेल्या कोचीनारा गावाच्या आरोपी पतीला कोरची पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर व तीन पोलीस अंमलदारांनी सापडा रचून उत्तर प्रदेशातील मथुरा वृंदावनातील ललितआश्रम परिसरातून सोमवारला अटक केली आहे.
प्रीतराम भक्तू धकाते (वय ४८) रा. कोचीनारा असे आरोपी नाव आहे. जावई व मुलाने मारहाण केल्यावर पत्नी मुलीकडे राहायला गेल्याच्या रागात २ जुलै ला सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या पत्नी रेखा धकातेवर कुऱ्हाडीने डोक्यात मारून हत्या केली तर प्रतिकार करणारी मुलगी श्यामबाई देवांगण हिला गंभीर जखमी केले दरम्यान जंगलात सरपनासाठी गावातील शेजारील महिला होत्या त्यांना सुद्धा धमकावले व जीवे मारणार म्हणाल्याने गावातील नागरिक दहशतीचा वातावरणात होते. परंतु आरोपीला अटक झाल्यानंतर गावातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
हत्येच्या घटनेनंतर कोरची पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर व त्यांचे तीन पोलीस अंमलदार फरार आरोपीच्या सतत शोधात होते. १२ जुलैला आरोपीचे सी टाईप मोबाईल लोकेशन उत्तर प्रदेशातील मथुरा वृंदावनला दाखवले. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस अंमलदार खाजगी वाहनाने वृंदावन च्या दिशेने रवाना झाले. वृंदावनात मोबाईलचे लोकेशन दोन किमी परिसरात दाखवत होते. त्यामुळे सहा पोलीस निरीक्षक व पोलिस अंमलदारांपुढे आरोपीला पकडण्याचे पुन्हा आव्हान आले. तेव्हा सहा पोलीस निरीक्षक गणेश फुलकर यांनी साधू बाबा, पोलीस हवालदार तेजराम मेश्राम यांनी दारुड्या, पोलीस शिपाई नरेंद्र धोंडणे यांनी रिक्षाचालक तर शिवशंकर भालेराव यांनी चना-मुगफली विक्रेता अशा वेशभूषेत वृंदावन येथे पाच दिवस राहून परिसरातील लोकांना मोबाईलवरुन आरोपीची फोटो दाखवून विचारणा केली तेव्हा दोन-तीन लोकांनी सांगितले ललित आश्रमाजवळ याला साधूच्या वेशात बघितले आहे. तेव्हा मोठ्या शेताफीने सापडा रचून पिक्चर स्टाईलने १६ जुलै रविवारी रात्री दीड वाजता आरोपी प्रीतराम हा साधूच्या वेशात झोपलेल्या अवस्थेत असतांना पकडले असून कोरची पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात कलम ३०२, २२६,५०६ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उप महा निरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर व पोलीस हवालदार तेजराम मेश्राम, पो शि नरेंद्र धोंडने, शिवशंकर भालेराव यांनी सदर कारवाई केली आहे.


