![]()
अहेरी पंचायत समितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ‘तुम्हीही अधिकारी बनू शकता’ म्हणत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचा अनोखा उपक्रम
गडचिरोली ! :
दहावी ही केवळ शालेय परीक्षा नसून विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरवणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक वाटचाल आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव याचा मजबूत पाया दहावीमध्येच घातला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा टप्पा अत्यंत गंभीरतेने आणि जाणीवपूर्वक घ्यावा, असे प्रेरणादायी आवाहन अहेरीचे प्रभारी तहसीलदार प्रतीक आढाव यांनी केले.
अहेरी पंचायत समिती सभागृहात बुधवारी गटविकास अधिकारी गणेश चव्हाण यांच्या संकल्पनेत तालुक्यातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रभारी तहसीलदार प्रतीक आढाव यांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, बीआरसी कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतीक आढाव पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक, शिक्षक आणि प्रशासन यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थीही मोठे यश संपादन करू शकतात. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवावी. अहेरीसारख्या भागातूनही अनेक युवकांनी युपीएससी आणि एमपीएससीसारख्या परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी पद मिळविले आहे. त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेऊन स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, असा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी गटविकास अधिकारी गणेश चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त क्षमतांवर विश्वास व्यक्त करत गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि प्रतिभा असल्याचे सांगितले. “फक्त योग्य दिशा आणि प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी पालकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन महत्त्वाचे असून पालकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रभारी तहसीलदार प्रतीक आढाव आणि गटविकास अधिकारी गणेश चव्हाण यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, पुस्तके व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पंचायत समिती स्तरावर प्रथमच अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
‘तुम्हीही अधिकारी होऊ शकता’; विद्यार्थ्यांच्या सुप्त इच्छांना नवी दिशा
या कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनातील अधिकारी होण्याचे स्वप्न जागृत करण्यासाठी राबविण्यात आलेला अनोखा प्रयोग. गटविकास अधिकारी गणेश चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि मॉडेल शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या कार्यालयीन केबिनमध्ये बसवून शासकीय कामकाजाची माहिती दिली. “खूप अभ्यास करा, उद्या तुम्हीही या खुर्चीवर बसू शकता,” असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत त्यांच्या मनातील सुप्त इच्छांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.