![]()
गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर; सात तालुक्यांमध्ये होणार वितरण
गडचिरोली, दि. १३ : संभाव्य युद्धजन्य परिस्थिती व आपत्कालीन गरजांचा विचार करून नागरिकांना स्वयंप्रकाश व दिवाबत्तीसाठी आवश्यक इंधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर अतिरिक्त केरोसीन मंजूर केले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत हे केरोसीन सात तालुक्यांमध्ये तालुकानिहाय वितरित करण्यात येणार असून, अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना वितरणात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, संभाव्य जोखमीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना अडचणीच्या काळात इंधनाचा तुटवडा जाणवू नये, यासाठी शासनाने विशेष नियतन मंजूर केले आहे. याअंतर्गत गडचिरोली तालुक्यासाठी सर्वाधिक १२ हजार लिटर, तर चामोर्शी, धानोरा, सिरोंचा, आरमोरी, कुरखेडा आणि कोरची या तालुक्यांसाठी प्रत्येकी ६ हजार लिटर केरोसीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब (PHH) शिधापत्रिकाधारकांना केरोसीन वाटपात प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर उपलब्धतेनुसार इतर शिधापत्रिकाधारक कुटुंबांनाही केरोसीनचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, ज्या कुटुंबांकडे गॅस जोडणी उपलब्ध नाही, अशा कुटुंबांनाही गरजेनुसार केरोसीन वितरित केले जाणार आहे.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज डहारे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, स्वयंप्रकाश व दिवाबत्तीसाठी आवश्यक असलेले केरोसीन नागरिकांनी आपल्या नजीकच्या अधिकृत केरोसीन विक्रेत्याकडून प्राप्त करून घ्यावे व शासनाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा.
संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता शासनाने घेतलेला हा निर्णय जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक मानला जात आहे.