१५९ गुन्ह्यांतील मुद्देमाल नष्ट; जेसीबी-रोड रोलरने बाटल्यांचा चुराडा, पर्यावरणाचीही घेतली काळजी
गडचिरोली, दि. २ एप्रिल : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध दारू तस्करीवर अहेरी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ३२ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण १५९ गुन्ह्यांमधील जप्त दारूचा साठा आज (दि. २ एप्रिल) अधिकृत परवानगीनंतर नष्ट करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्रीविरोधात सातत्याने मोहीम राबविण्यात येत आहे. अहेरी, पेरिमिली, वेंकटापूर आणि राजाराम (खा) या पोलिस ठाण्यांमध्ये २०२४ ते २०२५ या कालावधीत दाखल गुन्ह्यांमधील नाशवंत मुद्देमाल दीर्घकाळ साठवून ठेवणे कठीण ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली.
पोलीस ठाणेनिहाय कारवाई :
अहेरी : १४२ गुन्हे
पेरिमिली : ७ गुन्हे
वेंकटापूर : २ गुन्हे
राजाराम (खा) : ८ गुन्हे
या सर्व गुन्ह्यांमधील जप्त दारू महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत नष्ट करण्यात आली.
कारवाईदरम्यान अहेरी पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने १५x१५ फुटांचा खड्डा खोदून रोड रोलरने बाटल्यांचा चुराडा केला. त्यानंतर काच व प्लास्टिकचा चुरा खड्ड्यात टाकून तो पुन्हा बुजवण्यात आला. यावेळी पर्यावरणाचे नुकसान होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह पार पडली. यामध्ये सपोनि पटले, पीएसआय आनंद आवारे, योगेश महाजन, संतोष सडमेक व अन्य कर्मचारी सहभागी होते.
जिल्ह्यातील अवैध दारूविरोधातील कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले असून, या धडक मोहिमेमुळे दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.