![]()
लॉयड्सच्या शैक्षणिक क्रांतीमुळे आदिवासी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची सुवर्णसंधी; चौथ्या बॅचसाठी १३ ते २० जून अर्ज प्रक्रिया
गडचिरोली, :
दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तनाची नवी पहाट उगवत आहे. एकेकाळी परदेशात शिक्षण घेणे हे केवळ स्वप्न वाटणाऱ्या येथील विद्यार्थ्यांसाठी आज ऑस्ट्रेलियातील नामांकित विद्यापीठांचे दरवाजे खुले झाले असून, या परिवर्तनामागे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या दूरदर्शी सामाजिक बांधिलकीची ताकद उभी आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे गडचिरोलीतील तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होत आहेत. “खरा विकास माणसांमध्ये गुंतवणूक केल्यानेच घडतो,” या विश्वासातून त्यांनी या उपक्रमाला आकार दिला.
या उपक्रमाचा प्रेरणादायी परिणाम म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील २४ विद्यार्थी सध्या ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी केवळ स्वतःची स्वप्ने पूर्ण करत नसून संपूर्ण जिल्ह्याच्या आकांक्षा आणि क्षमतेचे प्रतिनिधित्व करत आहेत. योग्य संधी मिळाल्यास दुर्गम भागातील विद्यार्थीदेखील जागतिक स्तरावर यशस्वी ठरू शकतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
या यशस्वी वाटचालीनंतर आता चौथ्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया १३ जून ते २० जूनदरम्यान सुरू राहणार असून, आणखी एका विद्यार्थिगटाला आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्याची संधी मिळणार आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) शाखा असलेल्या लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनमार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला जात आहे. यामध्ये शिक्षण शुल्क, राहणीमानाचा खर्च, प्रवास तसेच शिक्षणाशी संबंधित सर्व आवश्यक बाबींचा समावेश आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या आड येत नाहीत आणि त्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येते.
विशेष म्हणजे, फाउंडेशनकडून प्रत्येक विद्यार्थ्यावर दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली जात असून, संपूर्ण अभ्यासक्रमासाठी प्रति विद्यार्थी अंदाजे १.५ ते २ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. ही भरीव गुंतवणूक गडचिरोलीच्या युवकांना सक्षम करण्यासाठी, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आणि भविष्यातील प्रादेशिक विकासाचे शिल्पकार घडविण्यासाठी एलएमईएलच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक मानली जात आहे.
गेल्या दोन वर्षांत या अभिनव शैक्षणिक उपक्रमाच्या तीन यशस्वी बॅचेस घडल्या असून, त्यांच्या यशोगाथा आज गडचिरोलीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. शिक्षणाच्या बळावर बदल घडविण्याची ताकद आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या प्रभावी अंमलबजावणीचे हे जिवंत उदाहरण मानले जात आहे.
दुर्गम गडचिरोलीतून जागतिक शिक्षणाच्या दिशेने झेपावणाऱ्या या विद्यार्थ्यांची वाटचाल आता जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याची नवी आशा बनली आहे.