Home Breaking News झाडे लावा, झाडे जगवा’च्या घोषणांनी दुमदुमले प्राणहिता अभयारण्य

झाडे लावा, झाडे जगवा’च्या घोषणांनी दुमदुमले प्राणहिता अभयारण्य

0
16

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ७०० फळरोपांचे वाटप; वृक्षदिंडी, प्रभातफेरी व जनजागृती अभियान उत्साहात

गडचिरोली : प्राणहिता वन्यजीव अभयारण्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून साजरा करण्यात आला. सिरोंचा वन विभागातील प्राणहिता वनपरिक्षेत्र, ग्राम परिस्थितीकीय विकास समिती (EDC) देवलमारी व रेपणपल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वनकर्मचाऱ्यांच्या परेडने झाली. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य वृक्षदिंडी व प्रभातफेरी काढण्यात आली. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पर्यावरणाचे रक्षण करा’, ‘वन्यजीवांचे संरक्षण करा’, ‘अवैध वृक्षतोड थांबवा’, ‘एक झाड माँ के नाम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थी, महिला, पुरुष आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली.

यावेळी देवलमारी गावात ४०० तर रेपणपल्ली गावात ३०० अशा एकूण ७०० फळरोपांचे वितरण करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला दोन रोपे देऊन त्यांची लागवड व संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. रोपे जगवून त्यांचे मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल तसेच भविष्यात फळांचेही उत्पादन मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कोसनकर यांनी ग्रामस्थांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देत लागवड केलेल्या रोपांची नियमित काळजी घेण्याचे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाला देवलमारी ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण कन्नाके, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कोसनकर, ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे सदस्य, महिला-पुरुष ग्रामस्थ तसेच वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षणाचा संदेश घराघरांत पोहोचविणाऱ्या या उपक्रमामुळे जागतिक पर्यावरण दिनाचा उत्सव प्राणहिता परिसरात जनजागृतीचा प्रभावी सोहळा ठरला.

“प्राणहिता अभयारण्यात पर्यावरण संवर्धनाचा जागर; ग्रामस्थांच्या सहभागातून हरित भविष्याचा संकल्प” 🌱🌳🦋

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here