१५ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन तस्कर जेरबंद, तिघे जंगलात पसार
गडचिरोली |
जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपत्तीवर डल्ला मारणाऱ्या आंतरजिल्हा लाकूड तस्करांच्या टोळीला आलापल्ली वनविभागाने जोरदार धक्का देत सागवान तस्करीचा मोठा भंडाफोड केला आहे. घोट वनपरिक्षेत्रातील निकतवाडा-अंबेला मार्गावरील शासकीय वनातून अवैधरित्या तोडण्यात आलेल्या सागवानाची वाहतूक करणाऱ्या टोळीवर वनविभागाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करून तब्बल १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन मुख्य तस्करांना रंगेहाथ अटक करण्यात आली असून त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उपक्षेत्र घोट अंतर्गत शासकीय जंगलात मोठ्या प्रमाणावर सागवान वृक्षांची बेकायदेशीर तोड करण्यात आली होती. या मौल्यवान लाकडाची एका मालवाहू वाहनातून अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती विकासपल्लीचे क्षेत्र सहायक बी. डी. साबळे यांना प्राप्त झाली. माहितीची खातरजमा होताच वनविभागाने तातडीने परिसरात सापळा रचून रात्रीपासून गस्त वाढविली.
बुधवारी पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास संशयास्पद एमएच-४० सीडी-४४१४ क्रमांकाचे मालवाहू वाहन निकतवाडा-अंबेला मार्गावरून येताना दिसताच वन कर्मचाऱ्यांनी त्याला अडविले. वनविभागाची चाहूल लागताच वाहनाच्या मागील भागात लपून बसलेले तीन इसम चालत्या वाहनातून उड्या मारून जंगलाच्या दिशेने पसार झाले. मात्र, वन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत वाहन चालक आकाश विनोद यादव आणि सौरभ सीताराम प्रधान या दोघांना रंगेहाथ पकडले.
यानंतर वाहनाची झडती घेतली असता हिरव्या जाळीच्या आड लपवून ठेवलेले सागवान प्रजातीचे गोल लाकडाचे ८ नग (१.३३९ घनमीटर) आढळून आले. वनविभागाच्या मूल्यमापनानुसार जप्त करण्यात आलेल्या सागवानाची किंमत १ लाख ५७ हजार ६२३ रुपये आहे. याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेले मालवाहू वाहन, ग्रीन नेट आणि दोन मोबाईल फोन असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. दरम्यान, फरार झालेल्या तिन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे.
ही धाडसी कारवाई आलापल्ली वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक बी. डी. साबळे, वनरक्षक एन. बी. गावडे, डी. जे. गावडे, सपना हिचामी आणि के. व्ही. भसारकर यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील लाकूड तस्करांच्या गोटात खळबळ उडाली असून वनविभागाने अवैध वृक्षतोड व तस्करीविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
वनमाफियांना वनविभागाचा इशारा
“जंगलातील मौल्यवान वनसंपत्तीची लूट करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून अवैध वृक्षतोड आणि तस्करी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा वनविभागाने दिला आहे.