![]()
गडचिरोलीत शेतकऱ्यांचा एल्गार; हजारो बैलगाड्या, कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक — भूमी अधिग्रहणाविरोधात बेमुदत रणसंग्राम सुरू
गडचिरोली |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टील हब’, एमआयडीसी आणि विमानतळ प्रकल्पांसाठी सुरू करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात गुरुवारी गडचिरोली जिल्ह्यात अभूतपूर्व शेतकरी एल्गार पाहायला मिळाला. “जमीन वाचवा, अस्तित्व वाचवा”चा नारा देत हजारो शेतकरी बैलगाड्या, कुटुंबीय, अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आणि भूमी अधिग्रहणाचा शासन निर्णय (जीआर) रद्द होईपर्यंत आंदोलनस्थळावरून न हटण्याचा निर्धार व्यक्त केला.
गांधी चौकातून निघालेल्या विराट मोर्चाने संपूर्ण शहर दणाणून सोडले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने जिल्हा मुख्यालय परिसर आंदोलनमय झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
२५ हजारांहून अधिक शेतकरी रस्त्यावर; प्रशासन सतर्क
आंदोलनात तब्बल २५ हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलनाची व्याप्ती आणि शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
“सुपीक जमीन हिरावून विकास नव्हे, विनाश घडवला जात आहे”
शेतकरी संघर्ष कृती समितीचे नेते तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनावर जोरदार हल्लाबोल केला. गडचिरोली तालुक्यातील हिटापूर, गुरुवळा, राखौं, शिरपूरचक तसेच चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील गावांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतरही अधिग्रहण प्रक्रिया रेटून नेली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
“शेतकऱ्यांशी संवाद नाही, संमती नाही आणि थेट सुपीक जमिनींवर बुलडोझर चालविण्याचे षडयंत्र सुरू आहे. अल्पभूधारकांसाठी शेती म्हणजे जीवनरेषा आहे. जमीन गेली तर संसार उद्ध्वस्त होतील. शासनाने आमच्या आंदोलनांची दखल घेतली नाही. त्यामुळे आता हा लढा आरपारचा असेल,” असा इशारा ब्राह्मणवाडे यांनी दिला.
बैलगाड्यांमधून आंदोलनस्थळी मुक्काम
आंदोलन दीर्घकाळ चालण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक शेतकरी बैलगाड्यांमध्ये अन्नधान्य, पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचे साहित्य आणि आवश्यक वस्तू घेऊनच आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. कडक उन्हातही शेतकऱ्यांचा उत्साह आणि निर्धार कायम दिसून आला.
विरोधी पक्ष व समाज संघटनांचा पाठिंबा
आंदोलनाला तेली, कुणबी, कलार समाजासह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देत आहेत.
शासन झुकणार की संघर्ष आणखी भडकणार?
रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता जमीन गमावण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष उफाळून आला असून हा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. भूमी अधिग्रहणाचा जीआर रद्द करण्याची मागणी मान्य होणार की संघर्ष अधिक तीव्र होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
“जमीन आमची, निर्णय आमचा!” शासनाच्या अधिग्रहण धोरणाविरोधात गडचिरोलीतील शेतकरी एकवटले; जीआर रद्द होईपर्यंत बेमुदत लढ्याचा निर्धार.