Home Breaking News २० जूनपर्यंत अर्ज करा; तूर बियाण्यांवर मिळणार भरघोस अनुदान

२० जूनपर्यंत अर्ज करा; तूर बियाण्यांवर मिळणार भरघोस अनुदान

0
1

महाडीबीटीच्या ‘शेतकरी योजना’ अंतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाला वेग

गडचिरोली, दि. ३ : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठी संधी उपलब्ध करून दिली असून महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ अंतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ मध्ये तूर प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांना तूर बियाण्यांवर तब्बल ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येतो. याच अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून दर्जेदार बियाण्यांच्या वापरातून उत्पादनवाढ साधण्याचा उद्देश आहे.

योजनेनुसार तीन वर्षांपर्यंतचे प्रमाणित बियाणे असल्यास बियाण्यांच्या किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये, तर तीन वर्षांपेक्षा अधिक व पाच वर्षांपर्यंतचे बियाणे असल्यास बियाण्यांच्या किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ३ हजार रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जून २०२६ असून अर्जदाराकडे आधार संलग्न फॉर्मर आयडी असणे बंधनकारक आहे. प्राप्त अर्जांमधून महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून संगणकीय सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वाचाही अवलंब केला जाणार आहे.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांमार्फत बियाण्यांचे वितरण करण्यात येईल. एका शेतकऱ्यास कमाल दोन हेक्टर क्षेत्रासाठीच या योजनेचा लाभ मिळणार असून यापूर्वी या घटकांतर्गत अनुदान घेतलेल्या शेतकऱ्यांना पुढील दोन वर्षे या योजनेचा लाभ मिळणार नाही.

दर्जेदार तूर बियाण्यांचा वापर करून उत्पादनवाढ साधण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here