Home Breaking News मुख्यमंत्री फडणवीसांचा आदिवासी विकासाचा नवा अध्याय!

मुख्यमंत्री फडणवीसांचा आदिवासी विकासाचा नवा अध्याय!

0
17

धानोरा-एटापल्लीत 20 हजार धुररहित चुलींचे वितरण पूर्ण; महिला आरोग्य, वनसंवर्धन आणि हवामान बदल नियंत्रणाला मोठी चालना

गडचिरोली, दि. 31 :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा आणि एटापल्ली या अतिदुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत तब्बल 20 हजार धुररहित चुलींचे वितरण पूर्ण करण्यात आले असून आदिवासी कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत आहे.

क्लीन मॅक्स उर्जित एलएलपी आणि क्लायमेटसेन्स प्रायव्हेट लिमिटेड (फार्मर्स फॉर फॉरेस्ट समूह) यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा उपक्रम स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे विशेष कौतुक करत हा उपक्रम आदिवासी भागातील विकासासाठी एक प्रभावी मॉडेल असल्याचे म्हटले आहे.

या धुररहित चुलींमुळे घरातील धूर आणि वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली असून महिलांच्या आणि बालकांच्या आरोग्यास मोठा दिलासा मिळाला आहे. श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ आणि धुरामुळे उद्भवणाऱ्या इतर आजारांमध्ये घट होण्यास मदत होत आहे. तसेच स्वच्छ आणि सुरक्षित स्वयंपाकघरामुळे ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान उंचावत आहे.

या उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे महिलांच्या श्रमांची बचत. सुमारे 95 टक्के लाभार्थी कुटुंबांनी जळाऊ लाकूड गोळा करण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महिलांना शिक्षण, स्वयंरोजगार आणि कुटुंबाच्या इतर कामांसाठी अधिक वेळ उपलब्ध होत आहे.

वनसंवर्धनाच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत असून सुधारित चुलींच्या वापरामुळे दरवर्षी सुमारे 41 हजार टन जळाऊ लाकडाची बचत होणार आहे. परिणामी जंगलांवरील ताण कमी होऊन जैवविविधतेचे संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होण्यास मदत मिळणार आहे.

याशिवाय दरवर्षी अंदाजे 9 हजार 200 टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य हरितगृह वायू उत्सर्जनात घट होणार असल्याने हवामान बदलाच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठीही हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम स्वच्छ ऊर्जा, महिला सक्षमीकरण, वनसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण यांचा संगम ठरत असून गडचिरोलीतील हा यशस्वी प्रयोग राज्यातील इतर आदिवासी व दुर्गम जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

🔹 20,000 धुररहित चुलींचे वितरण पूर्ण

🔹 19,600 हून अधिक कुटुंबांना लाभ

🔹 41 हजार टन जळाऊ लाकडाची वार्षिक बचत

🔹 9,200 टन हरितगृह वायू उत्सर्जनात घट

🔹 महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाला मोठा हातभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here