Home Breaking News गडचिरोलीत आरोग्य सेवेत ऐतिहासिक पाऊल!

गडचिरोलीत आरोग्य सेवेत ऐतिहासिक पाऊल!

0
9

मुलचेरात एकाच दिवसात 27 मातांवर ‘सिंगल पंक्चर’ दूरबीन शस्त्रक्रिया यशस्वी

दुर्गम आदिवासी भागातील महिलांना अत्याधुनिक कुटुंब नियोजन सुविधेचा लाभ

गडचिरोली,दि. 29 : दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या दिशेने आरोग्य विभागाने ऐतिहासिक पाऊल टाकत मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात एकाच दिवसात तब्बल 27 मातांवर ‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक ट्युबल लिगेशन’ अर्थात दूरबीनद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या. जिल्हा तसेच मुलचेरा तालुक्यात अशा प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रियांचे हे पहिले मोठे यश ठरले असून, आरोग्य सेवेच्या क्षेत्रात हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड मानला जात आहे.

या विशेष मोहिमेचे नेतृत्व जिल्हा शल्यचिकित्सक तथा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा लहाडे यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ मार्गदर्शन न करता स्वतः सर्व 27 शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने आणि यशस्वीरित्या पूर्ण करत आरोग्य विभागाच्या सेवाभावी कार्याचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ चमूने ही मोहीम यशस्वी करून दाखवली.

या उपक्रमात डॉ. स्मिता साळवे यांनी सक्रिय सहभाग घेत शस्त्रक्रियांच्या यशात मोलाचे योगदान दिले, तर भूलतज्ज्ञ डॉ. समीर बनसोडे यांनी आवश्यक भूलसेवा देत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पात्र महिलांपर्यंत पोहोचून त्यांचे समुपदेशन करत शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहित केले.

मुलचेरा ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनीही उत्कृष्ट समन्वय साधत या शिबिराच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांच्या प्रयत्नांमुळे एकाच दिवसात मोठ्या संख्येने शस्त्रक्रिया सुरक्षित, यशस्वी आणि निर्विघ्नपणे पार पाडणे शक्य झाले.

काय आहे ‘सिंगल पंक्चर’ दूरबीन शस्त्रक्रिया?

‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक’ शस्त्रक्रिया ही आधुनिक आणि सुरक्षित कुटुंब नियोजन पद्धती मानली जाते. या प्रक्रियेत पोटावर केवळ एक लहान छिद्र करून दूरबीनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे रक्तस्त्राव अत्यल्प होतो, टाके पडत नाहीत, वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरे होऊन दैनंदिन जीवनात परतू शकतात. विशेषतः दुर्गम व आदिवासी भागातील महिलांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

याबाबत बोलताना डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, “महिलांना सुरक्षित, प्रभावी आणि कमी त्रासदायक कुटुंब नियोजन सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मुलचेरा येथे मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.”

मुलचेरा ग्रामीण रुग्णालयातील या यशस्वी उपक्रमानंतर आता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात ‘सिंगल पंक्चर लॅप्रोस्कोपिक’ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरांचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक दुर्गम व आदिवासी भागातील महिलांपर्यंत अत्याधुनिक आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here