![]()
ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप; स्थानिक आदिवासी मजुरांमध्ये तीव्र नाराजी
गडचिरोली, : सिरोंचा तालुक्यातील रायगुडम येथील इंद्रावती नदी परिसरात गुरुवारी सायंकाळी निसर्गाने थैमान घालत तेंदूपत्ता पडीवर काम करणाऱ्या मजुरांवर अक्षरशः मृत्यू कोसळला. अचानक आलेल्या वादळासह आकाशीय वीज कोसळल्याने एका मजुराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगुडम येथील इंद्रावती नदीकाठावर तेंदूपत्ता पडीवर मजूर बोध भराईच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी साधारण पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला. जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह आकाशीय वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत एका मजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दोन मजूर गंभीररीत्या भाजले गेले.
घटनेनंतर जखमींना तातडीने छत्तीसगड राज्यातील भोपालपटनम शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर जगदीश मांदाळे (वय ४४) आणि कोमल दिलीप मांदाळे यांना पुढील उपचारासाठी बीजापूर रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित तिन्ही मजूर हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्याचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पातागुडमचे माजी उपसरपंच मल्लेश दुर्गम यांनाही विजेचा सौम्य झटका बसला. मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जीव गेला?
या दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तेंदूपत्ता ठेकेदार संगीता मनोज जैन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातून आणलेल्या मजुरांसाठी रायगुडम येथील इंद्रावती नदीच्या रेती परिसरात कोणतीही सुरक्षित निवास व्यवस्था किंवा खराब हवामानापासून संरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “ना राहण्याची व्यवस्था, ना सुरक्षेची खबरदारी; त्यामुळे एका गरीब मजुराला जीव गमवावा लागला,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
स्थानिक आदिवासी मजुरांचा रोजगार हिरावला?
या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पेंडलया, पातागुडम आणि रायगुडम परिसरातील स्थानिक आदिवासी मजुरांना यंदाही कामावर न घेता बाहेरील मजूर आणण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे स्थानिक मजुरांच्या रोजगारावर गदा येत असून त्यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेप्रकरणी पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाकडून पुढील तपास आणि आवश्यक कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.