Home Breaking News गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई! बनावट नंबर प्लेटच्या बोलेरोसह 14.87 लाखांची अवैध दारू...

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई! बनावट नंबर प्लेटच्या बोलेरोसह 14.87 लाखांची अवैध दारू जप्त

0
16

आलापल्लीत PWD कार्यालयासमोर सापळा रचून धडक कारवाई; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

गडचिरोली :

अहेरी-आलापल्ली, दि. 22 मे : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध दारू वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत बनावट नंबर प्लेट लावलेल्या बोलेरो कॅम्परसह तब्बल 14 लाख 87 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आलापल्ली येथे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर करण्यात आली.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाईच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली आणि पोलीस स्टेशन अहेरी यांच्या संयुक्त पथकाने दिनांक 21 मे 2026 रोजी सापळा रचून ही धडक कारवाई केली.

गोपनीय माहितीवरून पोलिसांचा सापळा

स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, एमएच 12 एसएक्स 6981 क्रमांकाच्या बोलेरो कॅम्परमधून अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक करून विक्री केली जाणार आहे. त्यानुसार पोलीस पथकाने पंचांसह आलापल्लीतील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर छापा टाकला.

तपासणीदरम्यान संशयित बोलेरो वाहनात मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचा साठा आढळून आला.

जप्त मुद्देमालाचा तपशील

पोलीसांनी वाहनातून पुढील मुद्देमाल जप्त केला :

▪️ हायवर्ड्स 5000 बिअर कॅन – 46 बॉक्समधील 1104 कॅन, किंमत ₹3,31,200

▪️ रॉकेट संत्रा देशी दारू – 2200 निपा, किंमत ₹1,76,000

▪️ रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्की बॅरेल – 120 बॅरेल, किंमत ₹4,80,000

▪️ बोलेरो कॅम्पर वाहन – अंदाजे किंमत ₹5,00,000

एकूण जप्त मुद्देमाल : ₹14,87,200

बनावट नंबर प्लेटचा संशय

या प्रकरणात वापरण्यात आलेल्या वाहनावर बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 65 (अ), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोनि. हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा व गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि. अरुण फेगडे तसेच अहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोनि. हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू माफियांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांचा वाढता दबाव पुन्हा अधोरेखित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here