![]()
ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; अभिनय, संवादकौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासावर भर
गडचिरोली : ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि राष्ट्रीय स्तरावरील नाट्यकलेचे मार्गदर्शन त्यांच्या दारी पोहोचावे या उद्देशाने National School of Drama (NSD) व Indian Oil Corporation यांच्या सहकार्याने तसेच आदिवासी ग्रामीण साहित्य बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० दिवसीय निशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. हा उद्घाटन सोहळा बुधवार, २० मे २०२६ रोजी वन वैभव शिक्षण मंडळ संचालित भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे पार पडला.
२० मे ते २० जून २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण शिबिर पूर्णपणे निशुल्क असून, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी ठरत आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना अभिनय, रंगमंच सादरीकरण, संवादकौशल्य, नाट्यदिग्दर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, शारीरिक हालचाली, आवाजाचे प्रशिक्षण आणि सांस्कृतिक जाणीव यांचे सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे सचिव अब्दुल जमीर हकीम हे उपस्थित होते. तर दृष्टि फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शाहीन अब्दुल जमीर हकीम यांनी उद्घाटक म्हणून उपस्थित राहून शिबिराचे उद्घाटन केले. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना कला व संस्कृतीच्या माध्यमातून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता विकसित करण्याचे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मुंबईचे प्रख्यात नाट्य मार्गदर्शक अखिलेश खन्ना यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना नाट्यकलेचे महत्त्व पटवून दिले. “रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे संयोजन कु. खुशबू मॅडम व राहुल पेंढारकर सर यांनी केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य शाहिद शेख सर आणि राणी दुर्गावती हायस्कूलचे मुख्याध्यापक लोणबले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिबिराचा लाभ घेऊन कला क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राजक्ता पेदापल्लीवार मॅडम यांनी केले. शाहिद शेख सर यांनी प्रास्ताविकातून शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला, तर सुहास मेश्राम यांनी आभार प्रदर्शन केले.
उद्घाटन कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या शिबिरामुळे अहेरीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे नाट्य प्रशिक्षण उपलब्ध होत असल्याने परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.