Home Breaking News तेंदूपत्ता तोडणीस गेलेल्या महिलेवर रानडुकराचा जीवघेणा हल्ला; पतीने जीव धोक्यात घालून वाचवले...

तेंदूपत्ता तोडणीस गेलेल्या महिलेवर रानडुकराचा जीवघेणा हल्ला; पतीने जीव धोक्यात घालून वाचवले प्राण

0
20

सोमनपल्ली जंगलातील घटना; वन विभागाची तत्पर मदत, जखमी महिलेला नुकसानभरपाईची मागणी

गडचिरोली, दि. १४ : जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जोरात सुरू असताना सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडणीस गेलेल्या एका आदिवासी महिलेवर रानडुकराने अचानक जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्या पतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, विमला गणेश तोरेम (वय ४५) या नेहमीप्रमाणे गावातील इतर मजुरांसह तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेल्या होत्या. सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास त्या तेंदूपत्ता तोडत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने जंगल परिसरात एकच गोंधळ उडाला आणि इतर मजूर जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले.

या हल्ल्यात रानडुकराने विमला तोरेम यांच्या पायावर जोरदार हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. यावेळी त्यांच्या पती गणेश तोरेम यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्नीची सुटका केली. त्यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्राधिकारी शिवाजी पानगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक शेखर गेडाम व वनरक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी महिलेला तत्काळ अंकीसा शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. याप्रकरणी वन विभागाकडून पंचनामा व पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, जंगल परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी महिलेला तातडीने आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई देण्याबरोबरच जंगल परिसरात वन्यप्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here