Home Breaking News बिनागुंडा दुर्गम भागात प्रशासनाची थेट धडक; योजनांच्या अंमलबजावणीला वेग

बिनागुंडा दुर्गम भागात प्रशासनाची थेट धडक; योजनांच्या अंमलबजावणीला वेग

0
16

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट; वनपट्टेधारकांना फार्मर आयडी, घरकुल व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

गडचिरोली, दि. १३:  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या बिनागुंडा परिसर दौऱ्यानंतर प्रशासनाने दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली असून, भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी संयुक्त क्षेत्रभेट देत शासनाच्या योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

तहसीलदार किशोर बागडे यांच्या नेतृत्वात आयोजित या क्षेत्रभेटीत बिनागुंडा गावातील गोटूल येथे विशेष सभा घेण्यात आली. यावेळी बिनागुंडा परिसरातील कुवा कोडी, तुरेमर्का आणि फोदेवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व संबंधित प्रश्नांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश जागेवरच देण्यात आले.

सभेदरम्यान वनपट्टेधारकांना ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी नोंदणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. शासनाच्या कृषी, आर्थिक व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यासोबतच घरकुल योजना, आरोग्य सेवा, ग्रामपंचायत सुविधा, वन विभागाच्या योजना तसेच इतर शासकीय उपक्रमांबाबत ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, वन विभाग, आरोग्य विभाग, तहसील कार्यालय तसेच इतर विभागांशी संबंधित अनेक समस्या मांडल्या. काही प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले, तर वरिष्ठ स्तरावरील विषय समन्वयातून मार्गी लावले जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

या संयुक्त क्षेत्रभेटीत गटविकास अधिकारी श्री. वानखेडे, क्षेत्रीय वन अधिकारी श्री. अमर भिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीष धाकटे, पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक, कोतवाल आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचविण्याच्या दृष्टीने ही संयुक्त क्षेत्रभेट महत्त्वपूर्ण ठरत असून, बिनागुंडा परिसरातील योजनांच्या अंमलबजावणीला यामुळे नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here