![]()
गडचिरोलीत ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात; ९ परिचारिकांचा सन्मान
गडचिरोली, दि. १३ : आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषद गडचिरोलीच्या आरोग्य विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला ‘फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषदेमधील वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आरोग्य सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ परिचारिकांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके तसेच जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. पंकज हेमके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना सुहास गाडे यांनी आरोग्य विभागाच्या सक्षम उभारणीत परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांच्या समर्पित सेवाभावाचे कौतुक केले. डॉ. वर्षा लहाडे यांनी “परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा खऱ्या अर्थाने कणा आहेत,” असे सांगून त्यांच्या सेवेला सलाम केला. तर डॉ. प्रताप शिंदे यांनी परिचारिकांना जनतेच्या आरोग्यासोबत स्वतःच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.
पुरस्कार विजेत्यांचा गौरव
यंदाच्या फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कारांत विविध श्रेणींतील आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
आरोग्य सेविका श्रेणीमध्ये अर्चना मुऱ्हारी मडावी (प्राथमिक आरोग्य केंद्र, पुराडा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रजनी कांचनलाल वासनिक (जिमलगट्टा) द्वितीय तर वैशाली भिवाजी झाडे (जिमलगट्टा) तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
आरोग्य सहाय्यिका श्रेणीत शोभा अरुण गेडाम (मालेवाडा) प्रथम, छाया नरेश गजभिये (कोटगुल) द्वितीय आणि विद्या हनुमंतराव ऊईके (पुराडा) तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
परिसेविका/अधिपरिचारिका श्रेणीत नजमा वाहीद बेग (ग्रामीण रुग्णालय, भामरागड) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. नंदा मनोहर वालको (जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली) द्वितीय तर सुनंदा रमेश चांदेकर (उपजिल्हा रुग्णालय, अहेरी) तृतीय पुरस्काराने सन्मानित झाल्या.
IDSP कामगिरीलाही विशेष दाद
यावेळी एकात्मिक रोग सर्वेक्षण (IDSP) अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आरोग्य सेविका, सेवक व फार्मासिस्ट यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच मुंबई येथे पार पडलेल्या DHPE प्रशिक्षणात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या स्मिता लोणारे आणि मीना राऊत या आरोग्य सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ असलेल्या परिचारिकांच्या योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, उपस्थितांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.