![]()
सहकाऱ्याच्या लेकीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संगणक परिचालक सरसावले; गडचिरोलीत माणुसकीचा आदर्श
गडचिरोली | रक्ताची नातीच माणसाला आधार देतात असे नाही, तर माणुसकीचे नातेही संकटाच्या काळात खंबीरपणे उभे राहते, याचा प्रत्यय गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा आला आहे. चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील संगणक परिचालक स्वर्गीय गौतम निमसरकार व त्यांच्या पत्नी स्वर्गीय वैशाली निमसरकार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर पोरक्या झालेल्या त्यांच्या चिमुकल्या लेकी कु. सिया हिच्या भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना पुढे सरसावली आहे. संघटनेने सियाच्या नावाने तब्बल २ लाख रुपयांची मुदत ठेव (FD) करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
स्वर्गीय गौतम निमसरकार हे ग्रामपंचायत अनखोडा येथे संगणक परिचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे निमसरकार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगी सहकाऱ्यांच्या कुटुंबाला आधार देण्याची सामाजिक जबाबदारी ओळखत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने राज्य व जिल्हास्तरावरून सानुग्रह मदतनिधी संकलित केला. हा निधी सियाच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी उपयोगी पडावा, या उदात्त हेतूने तिच्या नावाने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संगणक परिचालक संघटना गडचिरोलीच्या वतीने एलआयसी (LIC) मध्ये १२ वर्षांसाठी २ लाख रुपयांची सुरक्षित मुदत ठेव करण्यात आली असून, त्यासंदर्भातील अधिकृत एलआयसी बाँड नुकताच अनखोडा येथील सियाच्या निवासस्थानी जाऊन तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. या मदतीमुळे संकटाने खचलेल्या कुटुंबाला मोठा मानसिक आधार मिळाला आहे.
यावेळी राज्य उपाध्यक्ष मुकेश नामेवार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही आमच्या सहकाऱ्याला गमावले आहे, मात्र त्याच्या लेकीच्या भविष्यासाठी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. हा निधी सियाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच मोलाचा ठरेल.”
या संवेदनशील प्रसंगी राज्य उपाध्यक्ष मुकेश नामेवार, जिल्हाध्यक्ष संदीप बुरमवार, जिल्हा सचिव आशिष कंठीवार यांच्यासह चामोर्शी तालुक्यातील संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निमसरकार कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू असले तरी, त्या अश्रूंमध्ये सियाच्या भविष्यासाठी नव्या आशेची चमक दिसून आली.
सहकाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना संकटसमयीही कुटुंबाच्या पाठीशी उभी राहत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले असून, संगणक परिचालक संघटनेच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. “सियाच्या भविष्यास आता माणुसकीची मजबूत साथ लाभली आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.