खासगीत लाखोंचा खर्च आता शासकीय रुग्णालयात; दुर्गम भागातील रुग्णांना मोठा दिलासा
गडचिरोली, दि. ११ : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाने आरोग्य सेवेत एक ऐतिहासिक पाऊल टाकत प्रथमच ‘टोटल नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण) ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील या पहिल्याच यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जिल्ह्यातील अस्थिव्यंगाच्या रुग्णांसाठी उपचाराची नवी आशा निर्माण झाली असून, आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार आहे.
विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येणारी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया आता गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
ही महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच ऑपरेशन थिएटरमधील सुश्रुषा कर्मचारी यांनी समन्वयाने काम करत शस्त्रक्रिया यशस्वी केली.
या यशाबाबत बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील रुग्णांना स्थानिक स्तरावरच दर्जेदार आणि तज्ज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे संपूर्ण वैद्यकीय पथकाच्या मेहनतीचे फलित आहे.”
तर, डॉ. छाया उईके यांनीही संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आगामी काळात अशा आधुनिक आणि जटिल शस्त्रक्रिया नियमितपणे जिल्हा रुग्णालयात राबविण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.
या ऐतिहासिक यशाबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले असून, गडचिरोलीच्या आरोग्य सेवेसाठी हा एक नवा मैलाचा दगड ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.