![]()
तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा उघड; एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात
गडचिरोली | मौजा मेंढा येथे महिलेच्या खुनाच्या गंभीर प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत छडा लावत गडचिरोली पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि वेगवान तपासाच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी सायंकाळी मौजा मेंढा येथील अक्षय भानारकर यांच्या राहत्या घरी शामकला सुखदेव किरंगे (रा. हिडदा, ता. कुरखेडा) यांचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर गडचिरोली पोलीस ठाण्यात अप.क्र. ५७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि गडचिरोली पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत केवळ १२ तासांत संशयित सुदामा रामभाऊ चौधरी (वय ३३, रा. शिरसगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत सुदामा चौधरी याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने पूर्ववैमनस्यातून शामकला किरंगे यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर चेतन धर्माराव खोबरागडे (रा. इंदिरानगर, गडचिरोली) यालाही अटक करण्यात आली. याशिवाय, या गुन्ह्यातील एका विधीसंघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून विधीसंघर्षित बालकाला बाल न्याय मंडळासमोर सादर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे करीत आहेत.
या गुन्ह्याचा जलदगतीने उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, माधुरी मिसाळ, भावना राऊत तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे.