Home Breaking News गोंडवाना विद्यापीठाच्या STRC ला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा बहुमान

गोंडवाना विद्यापीठाच्या STRC ला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा बहुमान

0
28

HCSSC, नवी दिल्लीसोबत सामंजस्य करार; आदिवासी हस्तकला, कौशल्य विकास व रोजगार निर्मितीला नवी गती

गडचिरोली, : गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडीत गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राला (STRC) Handicrafts and Carpet Sector Skill Council (HCSSC), नवी दिल्ली यांच्याकडून अधिकृतपणे “सेंटर ऑफ एक्सलन्स” म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भातील सामंजस्य करार (MoU) नुकताच नवी दिल्ली येथे संपन्न झाला असून, यामुळे आदिवासी हस्तकला, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला नवी दिशा मिळणार आहे.

या धोरणात्मक सहकार्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी कारागीर, महिला बचत गट आणि युवकांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण, उद्योग-संलग्नता आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. पारंपरिक कला आणि हस्तकलेचे जतन करत आधुनिक बाजारपेठेशी जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम (ToT), विविध हस्तकला व व्यावसायिक प्रशिक्षण, शालेय स्तरावर पारंपरिक कला शिक्षण, बांबू हस्तकला व गोंड चित्रकलेसारख्या कलांचे संवर्धन, डोकरा हस्तकलेचे पुनरुज्जीवन तसेच गडचिरोली येथे अत्याधुनिक “स्किल हब” स्थापन करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

या स्किल हबच्या माध्यमातून उत्पादन विकास, डिझाईन नवोपक्रम, उद्योजकता प्रोत्साहन आणि बाजारपेठ उपलब्धता मजबूत केली जाणार असून, स्थानिक कारागिरांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

करारावेळी HCSSC चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कृष्ण कुमार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू तथा STRC फाउंडेशनचे सह-अध्यक्ष डॉ. प्रशान्त बोकारे आणि STRC चे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख स्वप्नील गिरडे उपस्थित होते.

या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापनेमागे STRC चे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी आणि कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांचे दूरदर्शी नेतृत्व लाभले. तसेच प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि महाराष्ट्र शासनाच्या आर.जी.एस.टी. विभागाच्या सल्लागार प्रगती गोखले यांचेही मोलाचे योगदान राहिले.

या उपक्रमासाठी STRC चमूने विशेष परिश्रम घेतले असून, मुख्य कार्यक्रम अधिकारी स्वप्नील गिरडे, वैज्ञानिक अधिकारी गंधर्व पिलारे आणि कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी विनोद वर्थ्या यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

नवीन मान्यता प्राप्त हे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ आता NSQF अनुरूप प्रशिक्षण, प्रशिक्षक विकास, प्रमाणन, डिझाईन नवोपक्रम आणि उद्योजकता विकासासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होणार आहे. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, सांस्कृतिक वारसा जतनासह प्रादेशिक आर्थिक सक्षमीकरणालाही मोठी चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here