![]()
16 गावांचे संघ मैदानात; ग्रामीण क्रिकेटला नवे व्यासपीठ, युवा प्रतिभेला मोठी संधी
गडचिरोली : हेडरी एटापल्ली ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या बहुप्रतिक्षित लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग (LVPL) स्पर्धेचा मंगळवारी हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. “एक संघ, एक गाव, एक जिद्द” या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात क्रीडा संस्कृतीला चालना देणे, युवकांना सकारात्मक दिशा देणे आणि गावागावांतील क्रिकेट कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, ग्रामीण भागातील युवकांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. बी. प्रभाकरन म्हणाले की, “लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून ग्रामीण प्रतिभा, सामुदायिक एकता आणि युवकांच्या स्वप्नांचा उत्सव आहे. या माध्यमातून गावागावांतील खेळाडूंना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
उद्घाटन सोहळ्यात परिसरातील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत आणखी वाढवली. “आपलं गाव, आपले खेळ” या घोषणांनी संपूर्ण मैदान दुमदुमून गेले.
या कार्यक्रमाला पुरसलगोंदीचे उपसरपंच श्री. राकेश कौडा, उदेरा ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. गणेश गोटा, विविध पोलीस अधिकारी, गाव पाटील, पोलीस पाटील तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील क्रीडा विकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे मत व्यक्त केले.
स्पर्धेत एकूण 16 गावांचे संघ सहभागी झाले असून त्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. लीग सामने 6 मे 2026 पासून सुरू झाले असून क्रिकेटप्रेमींमध्ये स्पर्धेबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
उद्घाटनाच्या दिवशी लॉयड्स क्रिकेट टीम आणि ऑल ग्रामीण इलेव्हन यांच्यात मैत्रीपूर्ण सामना रंगला. अवघ्या 6 षटकांच्या या रोमांचक सामन्यात लॉयड्स संघाने दमदार खेळ करत विजय संपादन केला.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स ग्राउंडवर स्पर्धेतील सर्व सामने खेळविण्यात येणार असून, एलव्हीपीएल ही ग्रामीण क्रीडा विकास, सामुदायिक ऐक्य आणि युवा सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून उदयास येत आहे.