![]()
प्रत्यक्ष भेट, तातडीने उपाययोजनांचे आश्वासन
गडचिरोली : तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंगुठा गावातील प्रलंबित मूलभूत समस्यांकडे अखेर लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले गेले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
गावभेटीदरम्यान डॉ. कंकडालवार यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, खराब रस्ते, अपुरी वीजपुरवठा, आरोग्य सेवेचा अभाव तसेच इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांचा पाढा मांडला. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नांमुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याचे चित्र समोर आले.
ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची सविस्तर नोंद घेत डॉ. कंकडालवार यांनी संबंधित विभागांशी तातडीने समन्वय साधून समस्यांचे लवकरात लवकर निराकरण केले जाईल, असे ठोस आश्वासन दिले. गावातील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रलंबित कामांना गती देण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आश्वासनामुळे मंगुठा गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या भेटीदरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी, प्रज्वल नागूलवार (काँग्रेस नेते, एटापल्ली), डोलेश मडावी, महेश बिरमवार, चिन्ना वेलादी, मनेश पुंगाटी, दौलत आलाम, बाजीराव इचामी, रामा तुमरेट्टी, जमुना गावडे, किशोर दुर्वा, संतोष वेलदी, परमेश वेलदी यांच्यासह गावातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.