![]()
नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे आवाहन
गडचिरोली, दि. ३ जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी चित्ररथाद्वारे व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून, नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेत योजनांची सविस्तर माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.
जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ १ मे रोजी करण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालयातून सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याच वेळी विविध योजनांवरील माहितीपर घडीपत्रिकेचेही विमोचन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम., ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहूल काळभोर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चित्ररथाच्या माध्यमातून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, महाराजस्व अभियान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांसह विविध महत्त्वपूर्ण योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, रमाई घरकुल योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, स्वाधार योजना आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आदी योजनांचा समावेश आहे.
बॅनर, ऑडिओ जिंगल्स व घडीपत्रिकांच्या माध्यमातून माहिती देत हा चित्ररथ जिल्ह्यातील दुर्गम भागांपर्यंत पोहोचणार असून, अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या उपक्रमाचा लाभ घेऊन शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी व त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा.