Home Breaking News आलापली ग्रामपंचायत कार्यालयात भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे घटना, जीवितहानी टळली

आलापली ग्रामपंचायत कार्यालयात भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे घटना, जीवितहानी टळली

0
23

गडचिरोली, दि. २३ — अहेरी तालुक्यातील आलापली येथील ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कार्यालयातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कक्षातून अचानक धूर व जळाल्याचा तीव्र वास येऊ लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ सतर्कता दाखवत कर्मचाऱ्यांनी कक्षाकडे धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला हातभार लावला.

कर्मचारी व स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आले, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. आग लागली त्यावेळी कार्यालयात कर्मचारी उपस्थित होते; मात्र सर्वांनी वेळेत बाहेर पडल्याने अनर्थ टळला.

या आगीत कार्यालयातील टीव्ही, ए.सी. तसेच इतर साहित्य जळून खाक झाले असून ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कक्षातील काही महत्त्वाचे दस्तऐवज व फाईल्स धुरामुळे खराब झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, घटनेनंतर प्रशासनाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून नुकसानाचे अचूक मूल्यांकन केले जात आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here